Sunday, September 23, 2018

दगा ssss

"इतिहासातील काही सत्य घटनांचा इथे प्रसंगानुरूप उल्लेख केलेला असून या कथेतील बहुतेक प्रसंग काल्पनिक आहेत. काही चुका किंवा काही आक्षेपार्ह आढळल्यास कमेंट मध्ये सांगावे व मोठ्या मनाने माफ करावे हि विनंती."
                                              संध्याकाळची वेळ होती. गर्द वनराईंनी नटलेल्या प्रतापगडावर सूर्याची तांबूस सोनेरी सूर्यकिरणे पडलेली होती. त्यामुळे त्याच्या सौन्दर्यात अजूनच भर पडत होती. गडाची तांबूस काळी अभेद्य तटबंदी अन भरभक्कम बुरुंज खुलून दिसत होते. आकाशामध्ये धनुष्याकृती बगळ्यांची माळ पश्चिमेकडे हळू हळू पुढे सरकत होती. काळ्या पक्षांच्या थवा त्या निरभ्र आकाशामध्ये वेगवेगळ्या दिशेने भिरभिरत होता. सायंकाळचा थंडगार वारा अंगाला झोम्बत होता. दिवसभर काम करून थकून भागून गेलेली शरीरं गार वाऱ्यामुळे थंडावत होती. बहिर्जीही आता गडावर पोहोचलाच होता. घाईनेच त्याने राजांच्या वाड्याकडे धाव घेतली. द्वारपालाशी बोलल्यावर कळलं की राजे आत्ताच काही शिलेदारांसोबत फेरफटका मारायला गेले आहेत. मग तो हि त्याच वाटेने निघाला. राजे त्यांच्या काही साथीदारांसमवेत तटबंदी वरून फेरफटका मारत होते. डोक्यावर भगव्या रंगाचा जिरेटोप अन शेंड्यावर पांढऱ्या सोनेरी रंगाचे मोती डुलत होते. कानातली सोनेरी कुंडलं राजांच्या चालीबरोबर मागेपुढे हेलकावे खात होती. मानेवर रुळणारे तांबूस काळे केस त्या एकूण व्यक्तिमत्वाला साजेसे दिसत होते. अन कपाळावरचे रेखीव शिवगंध, सायंसमयी सूर्यदेवाला अर्घ्यच देत असल्याचा भास होत होता. बुरुजावरून खानाच्या भेटीसाठी तयार असलेला शामियाना न्याहाळतच समोरच्या दगडी चौथऱ्याजवळ राजे काही वेळ विसावले. बाकीचे साथीदारही जागा मिळेल तसे आजुबाजूला राजांपासून पासून काही अंतरावर कोंडाळं करून बसले. थोड्या वेळापूर्वीच ते सगळे खानाच्या भेटीसाठीच्या उभारण्यात आलेला शामियाणा पाहून आले होते. कामगारांनी अन कारागिरांनी दोन दिवस अन दोन रात्र अविश्रांत मेहनत घेऊन सुशोभित, आकर्षक अन डोळ्यांचं पारण फिटेल असा मनमोहक शामियाना उभारलेला होता. शामियान्यातील बारीक सारीक अन लहानातील लहान वस्तू कुठे कशी असावी हे सगळे राजांनी स्वतः बारकाईने तपासले होते अन तशा सूचनाही दिल्या होत्या. प्रवेशद्वार कुठे असेल, मागचे द्वार कुठे असावे, बैठका किती व कशा प्रकारची त्यांची मांडणी असावी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी राजांच्या सल्ल्याने झालेल्या होत्या.
तेवढ्यात बहिर्जीही तेथे पोहोचला. राजे त्याला पाहताच म्हटले,
"या नाईक, काय म्हणतायत खानसाहेब.?"
राजांना मुजरा करतच म्हणाला, "म्हाराज, खान लय उतावळा झालाय तुमास्नी भेटाय."
त्याने सांगायला सुरुवात केली, "म्हाराज, शामियाण्यापासनं दहा बारा कोसाव खानाची छावणी हाय. म्या गीलू व्हतु त्या खानाच्या डेऱ्यात अत्तराच्या निमित्त काडून. लईच संशयी नजरेनं बगत व्हता. कुणाचा बी भरवसा ठेवत न्हाय जी. नोकर चाकराला तर कुत्र्यवानी हाडतुड करतंय. अन महत्त्वाचं म्हंजी, त्यो त्याच्या कपड्यांच्या आत चिलखत कधीच घालत न्हाय जी. पर अंगाव कमीत कमी तीन चार कपडे तरी अस्त्यात. सगळ्यात महत्वाचं म्हाराज, त्याचा येक साथीदार हाय. सय्यद बंडा का बडा सय्यद असं काय म्हणत्यात त्याला. दांडपट्टा चालवण्यात लय हुशार बगा. फक्त त्याच्यावरच त्याचा इस्वास् हाय जी. कुटं बी जावद्या त्यो खानासंग अगदी सावली सारका अस्तुय बगा."
तसं राजे लगेच म्हणाले, "हं, आम्ही खूप ऐकलंय त्याच्याबद्दल."
राजे जिवाजीकडे बोट करून म्हणाले, "तुम्ही त्याच्यावर भेटीच्या वेळी लक्ष ठेवाल. लक्षात ठेवा, फक्त न फक्त त्याच्यावरच लक्ष असुद्या. आम्ही खानाकडे बघू."
जिवाजी त्वेषाने, "जी म्हाराज, काळजीच नगु."
राजे जरा चौथऱ्यावरून उठले अन म्हणाले, "हं, ठीक. पण आपल्याला सावध असायला पाहिजे. न जाणो भेटीच्या वेळी खानाने चिलखत घातले तर आपला डाव फसायचा."
बराच वेळ ते तिथेच मसलत करत बसले होते. खानाच्या भेटीची रणनीती कशी असावी, कोण कोण सोबत असावे, कुणी कुठे थांबावे अशा गोष्टींवर चर्चा झाली. सगळेच खानाची कूटनीती जाणून होते. काय अन कसं होईल म्हणून सगळेच मनानं धास्तावलेले होते. अंधारही दाटून आला होता. राजांनी सगळ्यांना जेवणासाठी आज एकत्रच बसूयात म्हणून सांगितले अन सगळे वाड्याकडे चालू लागले.
                                    रात्रीची जेवणं उरकली. राजे त्यांच्या वाड्यातल्या गच्चीवर सज्जात बसवलेल्या झोपाळ्यावर बसले होते. पायांच्या झोकाबरोबर झोपाळा हलकेच झुलत होता. कड्यांचा हळुवार करकर आवाज होत होता.
दुरूनच बहिर्जी म्हणाला, "महाराज, ईव का?"
विचारांच्या तंद्रीत असल्याने अचानक आलेल्या आवाजाने राजे जरा दचकलेच.
बहिर्जी, "माफ करा महाराज, वर्दी दिऊन न्हाय आलू."
राजे, "नाईक....! या वेळी? एवढी काय तातडी? सकाळी बोललो असतो कि."
"राजं, जरा खाजगीचं व्हतं म्हणून.."
"या, बसा.", राजांनी हाताने खुणावताच बहिर्जी झोपाळ्याशेजारीच असलेल्या दगडी बैठकीवर येऊन बसला. त्याने दोन दिवसांपूर्वी जंगलात झालेल्या जंगली माणसांचा हल्ला अन त्यांच्या म्होरक्याने दिलेल्या विलक्षण तलवारीचा सगळा वृत्तांत राजांना कथन केला. बहिर्जीने ती तलवार राजांसमोर धरली. राजांनाही त्या तलवारीचे आश्चर्य वाटले. सोन्यानं मढवलेली नक्षीदार मूठ, त्यावर दोन्ही बाजूस निळ्या रंगाचा हिरा, हात सव्वा हात लांबीचं तलवारीचं सरळसोट पातं, अन वजनानेही नेहमीच्या तलवारीपेक्षा हलकी अशी ती तलवार राजे पहातच राहिले. त्याच्या सांगण्यानुसार राजांनी त्याच्याशी तलवारीचे दोन हात केले. राजांनी पेललेल्या त्या अद्भुत तलवारीने बहिर्जीने घेतलेल्या दोन्हीही तलवारी मध्यापासून तुटल्या. अन राजे अवाक् झाले. त्यांनाही तसाच अनुभव आला, जो त्याला जंगलामध्ये असताना आला होता. विस्मयकारक नजरेने राजे त्या अद्भुत अन विलक्षण तलवारीकडे पहात होते. वाड्यातल्या भवानी देवीच्या देव्हाऱ्यात राजांनी तलवार ठेवली. भवानी मातेसमोर नतमस्तक होत राजे विचार करत होते, कि या तलवारीच्या रूपाने तर आईने आशिर्वाद दिला नसेल?
****
                  खानाच्या वकिलाकडून खानाला भेटायचा दिवस नक्की करण्यात आला होता. निशस्त्र भेट अन दहा अंगरक्षक सोबत असावेत असे ठरले. भेटीसाठीचा दिवस साधारण नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गुरुवारी भर दुपारी मध्यान्ही ठरवण्यात आला होता. ठरवण्यात आला म्हणजे राजांनीच ती वेळ, तो दिवस ठरवला अन खानाला कबुल करायला भाग पाडले. खान शामियान्यात येऊन काही वेळ होतो न होतो तोच राजे त्याला येउन भेटणार होते. कारण शामियाण्यापर्यंत येण्यासाठी अर्धा कोस अंतर चालून यावं लागायचं. त्या वाटेवरून पालखी व मेणा आणणे खूपच अवघड अन जिकिरीचं होतं. जेमतेम एक माणूस चालत जाईल अशी खाचखळग्यांची, झाडाझुडपांनी वेढलेली अन बाजूलाच खोल दरी अशी ती बिकट वाट होती. या वाटेवरून चालत येताना खान अन त्याचे साथीदार थकून जातील अन त्याच वेळी त्यांना विश्रांतीचाही वेळ न देता आपण भेटायला जायचं अशीच वेळ राजांनी ठरवली होती. गडावरून खानाच्या छावणीपासून ते शामियान्यापर्यंतचा सगळा परिसर नजरेच्या टप्प्यात येत होता. त्यामुळे खानाच्या माणसांची सगळी हालचाल राजांना कळत होती.
****
                    राजांनी शामियान्यात पाय ठेवताच अफजल खान राजांच्या रोखाने बघून हसला. अन म्हणाला, " सिवाजी...! क्या तुम हि हो सिवाजी...?"
राजे ताच्या डोळ्यांना डोळे भिडवून म्हणाले, "काही शंका? अन खान..! खान म्हणतात ते तुम्हीच का?"
खान गडगडाटी हसला, "हाहाहाहाहाहा....!"
अन म्हणाला, "आओ राजे आओ, सब गिले शिकवे भुलकर हमारे गले लग जाओ. आओ...."
राजे सावध पावलं टाकत खानाकडे चालू लागले. खानाने राजांना मिठी मारली. खानाच्या उजव्या बाजूला राजांनी आलिंगन दिले अन डाव्या बाजूला आलिंगन देण्यासाठी ते झुकले. त्याचवेळी खानाने राजांच डोकं डाव्या हाताने काखेत दाबून धरलं. राजे क्षणभरच गोंधळले. तोवर खानाने उजव्या हाताने राजांच्या पाठीवर कट्यारीचा वार केला होता. करकर करत राजांच्या अंगरखा फाटला. खानाच्या लक्षात आले कि राजांनी आतमध्ये चिलखत घातले आहे. खानाचा वार हुका गेला. पण दुसऱ्याच क्षणी राजांनी त्यांच्या उजव्या हातात घातलेली वाघनखं खानाच्या उजव्या कुशीत खुपसली आणि जोर लावून पोटाच्या मध्यापर्यंत ओढली. खानाचा अंगरखा फाटून वाघनखं त्याच्या पोटात घुसली होती.
तशी, "दगा sssssssssssssssss ................", म्हणून खानाच्या शामियान्यात त्याची कानठळ्या बसवणारी जीवघेणी आर्त किंकाळी घुमली. राजांच्या मानेभोवती असलेली खानाच्या डाव्या हाताची पकड ढिली पडली. क्षणाचाही विलंब न करता राजांनी उजव्या हातात लपवलेला बिचवा कचकन खानाच्या उजव्या कुशीत खुपसला अन होत्या नव्हत्या तेवढ्या शक्तीनिशी खानाला मागे रेटले. खान धाडकन मागच्या आसनावर कोसळला. राजांनी मोठ्याने जिवाजीला आवाज दिला , "जिवाsssssssssss, तलवार....".
क्षणार्धात जिवाजीने राजांकडे तलवार फेकली.
"काफर कि औलाद..."
असे म्हणत अन ओरडत खान डाव्या हाताने पोटावर झालेली जखम सावरु लागला. खानाने बैठकीवर असलेल्या रेशमी वस्त्राखाली लपवलेली तलवार क्षणार्धात हाती घेतली. अन दुसऱ्या क्षणी त्याने राजांवर वार केला. राजांनी खानाचा वाराला पलट वार केला.
"खणSSSS....", असा आवज झाला अन खानाची तलवार अर्धी तुटली. एकच क्षण खान गडबडला अन पुन्हा त्याने तुटक्या तलवारीनिशी राजांवर वार केला. पुन्हा तेच घडले पण या वेळी राजांच्या तलवारीचा वार खानाच्या मस्तकावरच झाला अन खान पाठीमागे भेलकांडतच जाऊन पडला. त्याचक्षणी मागच्या द्वाराचा पडदा सारून आत आलेल्या सय्यद बंडाच्या दांडपट्याचा वार राजांच्या मस्तकावर झाला होता. डोक्यावर असलेला शिरपेच दूर जाऊन पडला अन त्याचबरोबर आतमध्ये असलेले शिरस्राणही. सय्यद बंडाचा वार एवढा जबरदस्त होता कि राजांच्या डाव्या भुवयीवर अर्ध्या बोटा एवढी लांब अन गव्हाएवढी खोल जखम झाली अन रक्तही येऊ लागलं. राजांना आता डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली होती. डाव्या हाताने ती जखम दाबून धरली अन कसेबसे धडपडतच सावरण्याचा प्रयत्न करू लागले. तोच एवढा वेळ खानाने त्याच्या डाव्या हाताने दाबून धरलेल्या पोटाच्या जखमेतून आतडीच बाहेर येऊ लागली खान ओरडतच तो ती दोन्ही हातांनी सावरू लागला. आता सय्यद राजावर पुन्हा वार करणार...! त्याने हातातील दांडपट्टा त्वेषाने राजांच्या दिशेने भिरकावला. त्याचा तो आवेश अन उगारलेला दांडपट्टा पाहताच राजांनी आपले डोळे बंद करून घेतले. "सप्प......", असा आवाज झाला अन राजांचा अंगरखा रक्तानं माखला. राजांनी थरथरत हलकेच पापणी वर उचलली तर समोर सय्यद बंडाचा हात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तरीही तो खांद्यापासून तुटलेल्या हातानीशी समोरच उभा होता. त्याने डाव्याहाताने कमरेची कट्यार उपसली अन पुन्हा तो राजांवर वार करणार, या वेळी मात्र त्याच शिरच धडावेगळं झालं अन धाडकन तो राजांच्या समोरच कोसळला. राजांबरोबर आलेल्या जिवाजीने शामियान्याच्या दारातूनच त्याच्या दांडपट्याच्या वाराने सय्यदचा खात्मा केला होता. शामियान्याबाहेर झाडाझुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या राजांच्या शिलेदारांनी पळणाऱ्या खानावर सपासप वार केले. ओरडतच खान खाली पडला तोच एका शिलेदाराने त्याचं मुंडक धडावेगळं केलं. कसलाच वेळ न दवडता राजांनी गड जवळ केला. ताबडतोब गडावरून तोफांना बत्ती देण्यात आली.
"धडाsssssssssssम धूम....धडाssssssssssम धूम"
तोफांवर तोफा गडावरून खानाच्या मुख्य छावणीवर बरसू लागल्या. खानाच्या छावणीतील सैन्याची जशी पांगापांग झाली तशी झाडाझुडपांमध्ये, जंगलांमध्ये दबा धरून बसलेली राजांची सेना खानाच्या गाफील, बेसावध असलेल्या सेनेवर तुटून पडली. अचानक झालेल्या हल्ल्याने, झाडा झुडपांतून येणाऱ्या बाणाने घायळ होऊन वाट फुटेल तिकडे खानाची माणसं सैरावैरा पळू लागली. पण पळून पळून पळणार तरी कुठवर जिकडे जाईल तिकडे घनदाट जंगल अन अचानक होणाऱ्या हल्ल्याने, कापकापीने खानाच्या सैन्याची दाणादाण उडाली होती. चहूबाजूंनी होणारे हल्ले, जाळपोळ, कापाकापी अन लुटालूट यामुळे खानाची थोडीशीच सेना कशीबशी पळून जाण्यात यशस्वी झाली. पण खानाबरोबर आलेली सगळी शस्त्र सामग्री, हत्ती, घोडे, उंट, तोफा, जडजवाहीर अन बरेच मौल्यवान सामान राजांच्या हाती लागले. अन स्वराज्यावर आलेलं खानरूपी महाभयंकर वादळ शांत झालं.
।। जय शिवराय ।।
******
(वाचकांच्या माहितीसाठी - छत्रपती शिवाजी महाराजांसोबत प्रतापगड संग्रामावेळी म्हणजे गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर १६५९, दहा साथीदार होते. नावे अनुक्रमे- संभाजी कावजी कोंढाळकर, जिवाजी महाले/महार, सिद्धी इब्राहिम, काटजी इंगळे, येसाजी कंक, कोंडाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सुरजी काटके, विसाजी मुरंबक, संभाजी करवार.)

- ईश्वर त्रिम्बक आगम (९७६६९६४३९८)
वडगांव निंबाळकर, बारामती.

शेरदिल

"इतिहासातील काही सत्य घटनांचा इथे प्रसंगानुरूप उल्लेख केलेला असून या कथेतील बहुतेक प्रसंग काल्पनिक आहेत. काही चुका किंवा काही आक्षेपार्ह आढळल्यास कमेंट मध्ये सांगावे व मोठ्या मनाने माफ करावे हि विनंती."

          लाल महालाच्या वाड्यात येऊन नुकतेच पाच सहा महिने झाले होते. शिवबा अन त्याचे सवंगडी नेहमीच काहीना काही उद्योग करण्यात मश्गुल असायचे. जिजाऊ तर त्यांच्या ना ना तऱ्हेच्या उद्योगांना अन कारस्थानांना कंटाळून गेल्या होत्या. तानाजी, येसाजी, कोंडाजी, बहिर्जी, बाळाजी अन अजून चार पाच जण अशी त्यांची पंधरा सोळा वर्षे वयोगटाची टोळी असायची. काही शिवबा पेक्षा वयाने मोठे, काही लहान तर काही जण त्याच्या वयाचे होते. शिवबाने आज रायरेश्वराच्या दर्शनाला जायचा बेत ठरवला होता. आजकाल शिवबा अन त्याच्या सवंगड्यांचे रायरीच्या डोंगर माथ्यावर अन रोहिडेश्वराच्या परिसरामध्ये फिरण्याचे प्रमाण वाढले होते. जाता जाता रोहिडेश्वराचे दर्शन अन ओळखीच्या गडकऱ्यांचीही भेट होणार होती. त्यामुळे सोबत शंभर दीडशे मावळ्यांची फौज दिमतीला होती. जवळच येसाजीचा गाव होता. शंभू महादेवाचं दर्शन घेऊन आजचा मुक्काम तिकडेच करणार होते. आऊसाहेबांच्या सांगण्यावरून अगोदरच मावळ्यांचा दानागोटा येसाजीच्या गावी जाऊन पोहोचला होता. येसाजीही पुढे जाऊन सगळा बंदोबस्त करण्यात गुंतून गेला होता. बहिर्जी अन त्याचे साथीदार आजूबाजूच्या परिसरावर चाणाक्ष नजर ठेऊन होते.
         दिवसाचा तिसरा प्रहार सुरु झाला होता. संध्यासमयी सूर्याच्या तांबूस सोनेरी प्रकाशाने आकाश उजळून निघाले होते. थंडगार वाऱ्याची झुळूक अचानक अंगाशी लगड करायची, तसं सरसरून अंगावर काटा यायचा. रायरेश्वराच्या मंदिराजवळचा परिसर हा तसा तीन एक कोसाच्या घेराचा, त्यामुळे फेरफटका मारायला चांगला वाव मिळायचा. जवळच असलेल्या उंच टेकडीवरून आजूबाजूचा नयनरम्य परिसर डोळ्यांचं पारणं फेडत असे. टेकडीच्या उत्तर बाजूला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर हे किल्ले दिसायचे अन नजर थोडी डावीकडे वळवली कि समोरचा केंजळगड नजरेत भरायचा. अन त्याच्या पलीकडे आदिलशाही अधिपत्त्या खाली असणारा जावळीचा प्रदेश टप्प्यात यायचा. जावळीच्या खोऱ्यात पारघाटाच्या तोंडावर अन रडतोंडी घाटाच्या नाकावर भोरप्या डोंगर एखाद्या पहारेकऱ्यासारखा भासायला. शिवबाला या डोंगराचे खास आकर्षण होते. डोंगराकडे बघत बराच वेळ विचार करत बसायचा.
          शिवबा अन त्याचे सात आठ सवंगडी रायरेश्वराच्या मंदिराकडे चालू लागले होते. डोक्यावर निळ्या रंगाचा अन चंदेरी किनार असलेला जिरेटोप उठून दिसत होता. गुलाबी ओठांवर तांबूस काळ्या रंगाचं मिसरूड डोकावू पाहत होतं. कमळाच्या पाकळ्या प्रमाणे असलेले डोळे व त्यावरील रुंद कपाळावरचे रेखीव शिवगंध अन मधोमध असलेला केसरी टिळा, त्या चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या चेहऱ्यावर अजूनच आकर्षक दिसत होते. शिवबा अन त्याच्या मित्रांनी शंभू महादेवाचे दर्शन घेतले अन मंदिराबाहेर असलेल्या दगडी चौथऱ्यावर जरा निवांत हवेला बसले. बराच वेळ शिवबा शांत बसला होता, काहीच बोलत नव्हता.
तेवढ्यात कोंडाजी म्हणाला, "राजं.... हिकडं आल्यापासनं आज जरा लईच गप झालाईसा."
शिवबा, "कोंडाजी, असं किती दिवस फक्त हे नावापुरतं राजेपण मिरवायचं."
बाळाजी, "का...? काय झालं राजं....?"
शिवबाने एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, "अजून कुठवर आपण आपल्याच मुलखात परक्यासारखं राहायचं. कुठे गडावर जावं म्हटलं, निसर्गरम्य ठिकाणी जायचं म्हटलं तरी गडकऱ्याची वा ठाणेदाराची परवानगी मिळेपर्यंत वाट बघत बसायची. आपलाच मुलुख, आपली माणसं अन हे परकीय लोक येऊन आपल्यावर राज्य करणार, यांचं लष्कर आपल्या रयतेचं पीकपाणी हिसकावून घेणार, मनमानी सारा वसूल करणार, दिवसाढवळ्या आय बहिणी उचलून नेणार. आता सहन नाही होत हे मित्रांनो."
कोंडाजी लगेच हाताची मूठ त्वेषाने उंचावत म्हणाला, "राजं.... तुम्ही फक्त हाक दया. या बारा मावळ्यातल्या घराघरातला एकूण एक माणूस हातात हत्यार घेऊन तुमच्या संगट हुभा राहायला तयार हाय."
"तुमच्या एका इशाऱ्यावर जीव द्यायला अन घ्यायला बी फूड मागं बगनार न्हाय जी.", तानाजीही तावानच बोलला.
"एवढ्यानं हे नाही होणार मित्रांनो. फक्त तरुण मावळ्यांना घेऊन जर आपण या जुलमी सत्ते विरोधात लढलो तर ते फक्त एक बंड होईल अन असे बंड केव्हाही मोडू शकतं. महाराज साहेबांनी सुद्धा असाच प्रयत्न केला होता. पण जर आपल्या मुलखातील वतनदार, जमीनदार, देशमुख या लोकांनी आदिलशाही वा मुघलांची चाकरी करणं सोडून एकजूट झाले तरच आपल्याला आपला अंमल, आपलं राज्य, स्वराज्य निर्माण करता येईल, साकारता येईल. जनतेला त्यांचं पीक पाणी खाता येईल. सगळीकडे शांतता अन सुबत्तता नांदू लागेल."
            शिवबाचं बोलणं चालू होतं. बसलेल्या एकाएकाच्या अंगात रक्त सळसळत होतं. हातांच्या मुठी आवळल्या जात होत्या. स्फुरण चढत होतं. पुन्हा एकदा शिवबा शांत झाला अन उठत म्हणाला,
"चला खूप वेळ झाला. येसाजी, बहिर्जी वाट बघत असतील."
शिवबा अन त्याचे शंभर दीडशे मावळ्यांचा पथक मुक्कामाच्या ठिकाणी चालू लागले.
            भल्या पहाटे शिवबा अन त्याच्या मावळ्यांनी गावाला निरोप दिला अन पुण्याकडे परतीचा प्रवास चालू झाला. हवेतला गारवा अंगाला झोबत होता. शिवबाने अंगावर शाल घट्ट बांधून घेतली होती. घोड्यांच्या टापांचा आवाज अन त्यामुळे मागे उडणारी धूळ हवेत मिसळून जात होती. हळू हळू सूर्य नारायणाचे दर्शन होऊ लागले होते. अंगावर सूर्याची सोनेरी कोवळी किरणे पडू लागली होती. पक्षांचा किलबिलाट आता ऐकू यायला लागला होता. मधूनच एखादा हरणांचा कळप हुंदडताना दिसे. तर मधेच मोरांचा "म्याऊऊउ........ म्याऊऊऊउ ....." आवाज कानावर पडे. समोरच काही माणसं हातात काठ्या घेऊन धावत जाताना नजरेस पडत होती. मागून येणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून मागे बघताच ती चार पाच माणसं बाजूला झाली अन कमरेत वाकून अन मान लवून त्यांनी शिवबाच्या येणाऱ्या मावळ्यांना वंदन केले. शिवबाने घोडा थांबवत तानाजीला पुढे पाठवून विचारपूस करायला सांगितली. तानाजीने शिवबाला येऊन सांगितले कि, समोरच्या गावात एका नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला आहे. दहा बारा शेळ्या मेंढ्यांचा अन दोन तीन गाया बैलांचा फडशा पडला होता. शिवाय दोन तीन माणसांना पण जखमी केलं होतं. आत्ताच एका लहान पोरावर झडप घालून त्येला जंगलात ओढत नेताना लोकांनी पाहिलं. जास्त लोक येताना पाहून त्याने त्या लहान पोराला तिथेच टाकून पळ काढला. त्यालाच बघायला हे लोक पळत निघाले होते.
          त्यांना घेऊन शिवबाचं अश्वदल गावात दाखल झालं. एका झोपडी समोर बायांचा रडण्याचा अन ओरडण्याचा आवाज येत होता. माणसं कोंडाळं करून तिथं उभी होती. शिवबाचं पथक तिथे येताच लोकांनी वंदन करायला सुरुवात केली. शिवबाराजे घोड्यावरून उतार झाले अन चालत जाऊन त्या जखमी झालेल्या मुलाची अवस्था अन त्या बाईचा आक्रोश पाहून गहिवरून आले. शिवबाचं पथक गावातल्या शंभू महादेवाच्या मंदिरापाशी थांबले.
"तान्या, येश्या"
दोघेही सर्र्र्रदिशी पुढे आले. "जी राजं.."
"बोला... काय विचार आहे?", शिवबा म्हणाला.
तानाजीने सपकन म्यानातून तलवार बाहेर काढली अन म्हणाला, "इचार कसला राजं आता. तुम्ही फकस्त सांगा, आत्ता त्या वाघाला जित्ता आणतो तुमच्या म्होरं.."
"आम्ही करणार त्या वाघाची शिकार..!", शिवबाराजे म्हणाले.
येसाजी, "आम्ही हाय कि राजं हितं. तुम्ही कशाला? तुम्ही फकस्त हुकूम सोडा."
"चला, आपण सगळेच जाऊया मग."
लगेच कोंडाजी म्हणाला, "चालतंय कि... चला. आज त्येचा मुडदाच पाडू."
         वाघाची शिकार करायची योजना नक्की झाली. बहिर्जी अन त्याच्या दोन तीन चलाख साथीदारांनी गावातल्या माहितगार तरुणांना घेऊन वाघ कुठे आहे हे नेमकं शोधून काढलं होतं. अन लागलीच येऊन शिवबाच्या कानावर घातलं. शिवाय जंगलाची खडानखडा माहिती असणारे काही लोकही शिवबाने बरोबर घेतले होते. त्यांच्या माहितीनेच सगळी योजना आखून कोण कोण कुठे कुठे थांबेल अन वाघावर हल्ला कुठून करायचं नक्की झालं होतं.
      एखाद्या मेंढराचा किंवा शेळीचा वाघासाठी सावज म्हणून वापर करावा लागणार होता. पण शिवबाला तेही जीवावर आलं होतं. कारण त्या मुक्या जीवाशी खेळून वाघाला मारणे त्याच्या बुद्धीला पटत नव्हते. शेवटी बहिर्जीने स्वतः शेळीचा आवाज काढून वाघाला फसवायचा धोका पत्करला.
          वाघ ज्या वाटेने येणार होता त्या वाटेवरच एका झुडपामध्ये बहिर्जी लपून बसला होता. त्याच्या कमरेला एक दोर बांधून त्याचं दुसरं टोक कोंडाजी अन बाळाजी शेजारच्या झाडावर धरून बसले होते. जर वाघाने बहिर्जीवर हल्ला केलाच तर कोंडाजी त्याला झाडावर ओढून घेणार होता. झुडपाच्या विरुद्ध बाजूला एका मोठ्या झाडाच्या खोडाच्या आडोशाला समोर झाडाच्या फांद्या अन पाने लावुन केलेल्या जाळीच्या पाठीमागे शिवबा हातात तिर कमान घेऊन उभा होता. कमरेला तलवार अन जवळच भालाही ठेवलेला होता. त्याच्या मागे तानाजी भाला घेऊन तर अजून चौघे जण हातात तिरकमान घेऊन सावध होते. शिवाय अजून दहा बारा मावळे हातात तलवारी भाले घेऊन उभे होते. वाघ येताच एकाच वेळी त्याच्यावर बाणांचा वर्षाव होणार होता.
          येसाजी अन अजून दोघेजण झुडपापासून वाघ येण्याच्या वाटेवरच्या जवळच्या झाडावर दबा धरून बसले होते. हातात भाले घेऊन सगळे सज्ज होते. येसाजीच्या इशाऱ्यावर कोंडाजी दोरीला हिसका देणार होता अन बहिर्जीला हिसका लागताच तो जोरजोरात बकरीचा आवाज करणार होता. सगळे जण ठरल्या प्रमाणे आपापल्या जागेवर दबा धरून बसले होते.
      जंगलात निस्तब्ध शांतता पसरली होती. फक्त पक्षांचा मधूनच आवाज होई. सूर्यही हळू हळू वर येऊ लागला होता. अचानक एकदम समोरच्या डोंगरवजा टेकडीवरून गावातील काही जिगरबाज तरुणांनी हातात भांडी अन ढोल घेऊन जोर जोरात बडवायला सुरुवात केली. वाघ ज्या ठिकाणी बसला होता तिथून काही अंतरावरून ते हळू हळू पुढे पुढे येऊ लागले. तसं वाघ त्यांच्या विरुद्ध दिशेने शिकारीच्या ठिकाणाकडे पळत येऊ लागला. येसाजीने ते धूड आपल्याच दिशेला येताना पाहून काही आवाज काढून ढोल अन भांड्यांचा आवाज बंद करण्याचा इशारा केला. समोरच्या गवतातून, झुडपांतून खसखस आवाज होऊ लागला. आता ढोलांचा अन भांड्यांचा आवाजही बंद झाला होता. अचानक ते धूड दुसऱ्या दिशेला वळताना पाहून झाडावर बसलेल्या येसाजी ने पटकन कोंडाजीला इशारा केला. दुसऱ्या क्षणी त्याने जोरात दोरीला हिसका दिला. त्या सरशी बहिर्जीने शेळीचा मोठमोठ्याने आवाज करायला सुरुवात केली. अचानक ते तांबडं पिवळं चट्टेरी अन काळ्या पट्ट्यांच धूड थांबलं अन बहिर्जी जिथे लपून बसला होता त्या झुडपाच्या दिशेने झेपावू लागलं. आता फक्त पंधरा वीस पावलांच अंतर शिल्लक होतं. वाघ हल्ल्याच्या पवित्र्यात त्याची दमदार पावले टाकत अन गुरगुरत सावकाश शेळीचा आवाज येत असलेल्या झुडपाजवळ येऊ लागला होता. दोन चार माणसांना सहज लोळवेल एवढं मोठं ते धुडं होतं. चालीबरोबर त्याची सोनेरी कातडी उन्हात झळाळून निघत होती. ते अजस्त्र धूड आपल्याच दिशेने येताना पाहून बहिर्जीच्या छातीत धडधड वाढू लागली होती. शिवबाने फांद्यांपासून बनवलेल्या जाळीतून ते धूड निरखून घेतलं. अन बाणाचा अचूक नेम धरला. त्या पाठोपाठ सावध पवित्र घेऊन बाकिच्यांनीही आपापले बाण ताणले.
      अचानक कोंडाजीला दोरीचा हिसका बसला. झुडपात खुसखुस वाढू लागली तशी कोंडाजीने दोरी वर ओढायला सुरुवात केली. बहिर्जी वर वर जाऊ लागला. वाघ आता त्या झुडपावर झडप घालण्याच्या पवित्र्यात असताना अचानक शिवबा अन त्यांच्या साथीदारांनी सप सप बाण वाघाच्या दिशेने सोडले. एका बाण वाघाच्या डोक्यावरून गेला. वाघ सावध झाला. तो मान वळवणार तोच दुसऱ्या क्षणी एक बाण त्याच्या डाव्या कानसुलात घुसला तर दुसरा पुढच्या पायाच्या वर तर बाकीचे हुकले. त्यासरशी त्याने मोठयाने एक डरकाळी फोडली. त्याच्या आवाजाने सारा आसमंत दुमदुमून गेला. त्याच्या कानातून रक्ताची धार लागली होती. मानेला झटके देत गुरगुरत तो बाण आलेल्या दिशेने झोकांड्या देत, तोल सावरत झेपावू लागला. पुन्हा एकदा सप सप बाण सुटले. यावेळीही दोन तीन बाण त्याच्या शरीरात घुसले. त्यासरशी ते अजस्त्र धूड जमिनीवर गुरगुरत धाडकन कोसळलं. कोंडाजी, येसाजी, बहिर्जी अन त्यांचे चार पाच साथीदार खाली आले. वाघाच्या मागच्या बाजूने हातात भाले घेऊन पुढे सरसावू लागले. शिवबा अन तानाजीही हातात भाले पेलत जाळीतून बाहेर आले. वाघाच्या गुरगुरण्याचा आवाज अजूनही येत होता. शिवबा धीमी पावलं टाकत अन भाला पेलत समोर येत होता. अचानक ते धुड उठलं अन डोळ्यांचं पातं लवते न लवते तोच ते मोठ्याने गुरगुरत शिवबावर झेपावलं. एकदम अंगावर आलेलं ते एवढं मोठं धुड अन त्याचा तो आवेश पाहून शिवबा क्षणभरच गंगारला. पण दुसऱ्याक्षणी स्वतःला सावरत, होत्या नव्हत्या शक्तीनिशी भाल्याचा वार वाघाच्या छताडावर केला. रक्ताची चिळकांडी शिवबाच्या तोंडावर उडाली. शिवबा दोन तीन पावलं जाऊन मागे कोसळला.
कोंडाजी अन येसाजी एकदम ओरडले, "राजं ssssssss".
      दोघेही एकदम शिवबाकडे धावले. वाघाच्या पंजाने निशाणा साधलेला होता. शिवबाचा अंगरखा डाव्या खांद्यापासून छातीच्या उजव्या भागापर्यंत फाटला होता. रक्ताच्या तीन लकेरी छातीवर स्पष्ट दिसू लागल्या अन त्यातून रक्त डोकावू लागलं. पण तोवर भाल्याचा फाळ वाघाच्या छताडात घुसून आरपार झाला होता. भळभळ रक्त वाहू लागलं होत अन ते अजस्त्र धुड जमिनीवर निपचित पडलं होतं. येसाजी अन कोंडाजीने धावत जाऊन शिवबाला उचलले. तानाजीने पुन्हा दोन तीन वेळा भाला वाघाच्या पोटात खुपसून खात्री केली. मावळ्यांनी शिवबाला उचलून गावात नेले. त्या वाघाला उचलण्यासाठी चार पाच माणसं लागली. जखम खूप खोल नव्हती. वैद्यांनी झाड पाल्याचा लेप लावुन जखम बांधुन घेतली. सगळीकडे शिवबा राजेंचा जयजयकार चालू होता. शिवबाराजेंनी वाघ मारला म्हणून सगळीकडे एकच बोभाटा झाला. जो तो मेलेल्या वाघाला बघायला गर्दी करू लागला होता.
       वाघाचं धुड घोड्यावर लादून, थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा शिवबाचं अश्वद्ल पुण्याच्या दिशेने दौडू लागलं. सगळेच आनंदात होते, पण शिवबाच्या मनात फक्त एकच भितीयुक्त विचार घोळत होता,
"हे आऊसाहेबांना कळलं तर????"
"जय शिवराय"
****
- ईश्वर त्रिम्बकराव आगम
वडगांव निंबाळकर, बारामती, पुणे.
भ्रमणध्वनी - +९१ ९७६६९६४३९८

बहिर्जी एक थरार

"एक ऐतिहासिक पण काल्पनिक कथा. काही चुका किंवा काही आक्षेपार्ह आढळल्यास कमेंट मध्ये सांगावे व मोठ्या मनाने माफ करावे हि विनंती."
                  डेऱ्यामध्ये बहिर्जी व त्याचे मित्र चिंतातुर अवस्थेत बसलेले होते. कालपासून त्या रस्ताने गेलेले त्याचे चारही साथीदार परतलेले नव्हते. तो बैठकीच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेमध्ये येर झाऱ्या घालत होता. मधेच उजव्या हाताची मूठ डाव्या तळहातावर मारत होता. कापडी पडद्याला असलेल्या खिडकीतून येणाऱ्या सूर्य प्रकाशाने डाव्या हातात घट्ट बसलेलं सोन्याचं कडं मधूनच चमकूनच जायचं.
तो रागातच म्हणाला, "दोन दिस झालं, तुम्ही मला हे आत्ता सांगताय व्हय?"
त्याचा एक साथीदार, "तसं न्हायी नाईक, पर आम्हास्नी वाटलं येत्याल आज उद्या, झाला असलं उगा उशीर म्हून न्हाय जी सांगितलं."
"आरं... पर ती काल गेल्याली बी आपली माणसं अजून परत न्हायी आली. तरी बी तुमि आजून दोघांना कशाला पाठिवलं?"
"आव, तेच तर ना..! चालल्यात तर काम बी हुईन आन त्या दोघांना का उशीर झाला ते बी बगुन येत्यान."
"आरं.....पण मला सांगायचं ना आदी." तो घोगऱ्या आवाजात जराश्या घुश्यातच म्हणाला.
तसं सगळ्यांनी माना खाली घातल्या. लगेचच त्याने त्याच्या दहा एक शूर साथीदारांना तयार राहण्यासाठी सांगितलं. थोड्याच वेळात त्यांनी त्या दिशेने कूच केलं.
****
                 बहिर्जी त्याच्या दहा एक हत्यारबंद साथीदारांसमवेत त्या निबिड जंगलातील पायवाटेने दबक्या पावलांनिशी हळू हळू पुढे सरकत होते. जसे जसे ते पुढे पुढे सरकत होते, तस तसं झाडांची गर्दी वाढू लागली होती. अन प्रकाशही कमी कमी होऊ लागला होता. पक्षांचा किलबिलाटही आता बंद झाला होता. वातावरणातही एक प्रकारची गूढ शांतता पसरली होती. वारा तर पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे सगळ्यांची शरीरं घामाने ओली होऊन गेली होती. मधूनच काहीतरी जळाल्याचा वास यायचा. त्याची भेदक नजर मात्र त्याने समोरच्या दिशेने रोखून धरली होती. आता त्यांना काहीसा पांढरट धुरकट धूर दिसायला लागला होता. अन हळू हळू तो धूर आसपासच्या झाडांवर पसरू पाहत होता.
अचानक त्याच्या मागे त्याला, "आ sssssssssssss", असा आवाज आला.
त्याचा एक साथीदार गारद झाला होता. त्याच्या दंडात एक विचित्र बाण घुसलेला होता. त्याने तो बाण उपसून काढला. त्याला उठवायचा प्रयत्न करू लागला. पण तो निपचित पडला होता. त्याने त्याच्या नाकाजवळ बोटं नेऊन बघितलं. श्वास चालू होता पण तो असा काही पडला होता जणू मेला आहे कि काय. त्याला जवळच झाडाच्या आडोशाला ठेवून ते निघणार तेव्हड्यात त्यांच्यावर "सुं सुं" करत बाणांचा वर्षाव होऊ लागला. त्याने पटकन आपली ढाल काढली अन एका झाडाचं आडोसा घेतला. बाण कुठून अन कोण मारतय ते पाहू लागला. एकापाठोपाठ एक असे त्याचे सगळे साथीदार बाण लागून बेशुद्ध पडत होते. त्याने मोठ्या शिताफीने स्वतःला बाण लागण्यापासून वाचवले होते. अचानक दोन तीन तलवार धारी माणसं त्याच्यावर चालून आले. माणसं कसली जंगली भूतच होती ती. त्यांच्यावर वार करत, त्यांचा वार चुकवत तो आता एका रानटी वस्तीजवळ येऊन पोहोचला होता. अंधारही दाटून यायला लागला होता. त्याने दोन जणांना आपल्या तलवारीचं पाणी दाखवलं होत. जखमी होऊन व्हीवळत ते बाजूला पडले होते. त्याच्या हि छातीवर एक निसटता वार झाला होता. पण अंगावर असलेल्या चामडी गंजीमुळे त्याला इजा झाली नाही. पण अचानक एक विचित्र पेहरावातील इसम त्याच्या समोर आला. वयानं त्याच्या पेक्षा थोराड असला तरी सहा साडे सहा फूट उंच, मजबूत बांध्याचा अन रंगानं एकदम काळा कुळकुळीत, डोक्यावर जंगली जनावराच्या हाडांपासून बनवलेल्या मुगुटासारखं काहीतरी अन त्यावर मोरपंख खोवलेलं होतं. त्याच्या हातात एक विलक्षण अशी तलवार होती. नेहमीच्या तलवारींपेक्षा त्याची तलवार काहीशी वेगळ्या थाटणीची होती. तिची मूठही सोन्यानं मढवल्यासारखी दिसत होती. अन मुठीच्या वर एक निळ्या रंगाचा खडा चमकत होता. आजूबाजूच्या पेटत्या पलित्यांमुळे त्यावर काहीशी सोनेरी रंग छटा असल्याचा भास व्हायचा. सोनेरी रंगाने लकाकती ती तलवार बघून बहिर्जी काहीसा अचंबित झाला. पण दुसऱ्याच क्षणी त्याने स्वतःला त्या इसमावर वार करण्यासाठी सज्ज केलं. दोघांनी हि एकमेकांवर तलवारी उगारल्या. "खण्ण", असा आवाज झाला. त्या इसमाने फिरून पुन्हा त्याची जागा घेतली. तोही फिरून पुन्हा त्याच्या समोर ठाकला. पण त्याच्या डोक्यावरच काळ्या रंगाचं मुंडासं दूर जाऊन पडलं होतं. समोर मातीत अर्ध्या तुटलेल्या तलवारीचं पातं चमकत होतं. अन अर्ध्या तुटलेल्या तलवारीनिशी तो तसाच आवक होऊन समोर उभ्या असलेल्या इसमाकडे विस्मयकारक नजरेने पाहत होता. काय झालंय हे कळायला त्याला वेळ लागला नाही. त्याने हातातली तुटलेली तलवार फेकून दिली अन दुसरे अर्धा हात लांबीचे हत्यार हाती घेतले. त्याने पुन्हा त्या इसमावर वार केला पण छे! या वेळीही त्याचे हत्यार तुटून त्या तलवारीचा निसटता वार त्याच्या मस्तकावर डाव्या बाजूस झाला. जखम खोल नव्हती, त्याने पटकन हात लावून पाहिलं. रक्ताची एक लकेर हातावर उठून दिसली. त्याच्या समोर त्या सोनेरी पात्याची तळपती तलवार लकाकत होती. आता मात्र त्याला कळून चुकले कि त्या तलवारीमध्ये अशी काय शक्ती होती की त्याच्या जवळच्या दोन्ही तलवारी तिच्या समोर निकामी झाल्या. कमरेचं शेवटचं हत्यार, खंजीर हाती घेऊन सावध पवित्र घेतला पण आता वार करायला तो धजावत नव्हता.
समोरचा इसम बहुतेक तो त्या जंगली माणसांचा म्होरक्या असावा. समोरच्या दगडी छबूताऱ्यावर चढून त्याच्या कडे बोट करून म्हणाला,

"झालं का? का आजून हाय काय बाकी?"

बहिर्जी, "हुं."

म्होरक्या, "आरं बगताय काय, धरा ह्याला अन मुसक्या आवळा हेच्या."

तसे त्याचे चार पाच साथीदार त्याला धरायला सरसावले.
हे ऐकताच बहिर्जीने हात वर उचलून तोंडाने काहीतरी विचित्र आवाज काढले. त्याच्या त्या विचित्र आवाजाने, आत्ता पर्यंत शांत असलेलं ते वातावरण अचानक पक्षांच्या चित्र विचित्र आवाजाने भरून गेलं. आसपासच्या सगळ्या झाड झुडपांवर पक्षांनी एकाच गर्दी केली होती अन कधीही न ऐकलेला कलकलाट, किलबिलाट चालू होता. सगळे अवाक् होऊन आसपास पाहू लागले. झाडांच्या फांद्या, झाडे, झुडपे, शेजारच्या राहुट्या अन जिथे जागा मिळेल तिथे पक्षांनी एकच गर्दी केली होती. समोर येणाऱ्या त्या चार पाच माणसांना काही कळायच्या आत त्यांच्या वर काही घारींनी अन कावळ्यांनी हल्ला केला. अचानक झालेल्या पक्षांच्या हल्ल्याने ते भांबावून गेले, हत्यार उपसायचा वेळही त्यांना मिळाला नाही.
त्या जंगली इसमा समोर येउन त्याच्या नजरेत नजर भिडवून बहिर्जी म्हणाला, 

"गपगुमान माझ्या माणसांला सोडायचं, न्हायतर इथं येक बी जित्ता न्हाय ऱ्हायचा."

त्या जंगली माणसांचा म्होरक्या आपल्या साथीदारांची त्या पक्षांपासून वाचायची चाललेली धडपड पाहत होता. अन "आम्हाला वाचवा, वाचवा.", म्हणून त्यांचा चाललेला आरडाओरडा ऐकून त्याला हा काही तरी वेगळाच प्रकार अन हा कोण तरी अजब इसम आहे असे वाटू लागले. तो ताडकन त्या दगडी छबूताऱ्यावरून उतरुन त्याच्या समोर आला, हात जोडले, त्याचा आवाज आता मवाळ झाला होता.

"मी सोडतो तुमच्या मानसास्नी, पर हे थांबवा."

त्याने हात खाली घेतला अन पुन्हा एकदा विचित्र आवाज केला. दुसऱ्या क्षणी ते पक्षी उडून पुन्हा झाडावर जाऊन बसले. पक्षांच्या हल्ल्याने त्या माणसांची शरीरं जागोजागी रक्तानं माखली होती. चेहऱ्यावरही जखमा झाल्या होत्या. त्यांच्या म्होरक्याने त्याच्या सगळ्या माणसांना सोडण्यासाठी सांगितले अन बहिर्जीला विनंतीच्या स्वरात म्हणाला,

"आपण कोण, आम्हास्नी कळलं तर बरं हुईल, तुमचा येक बी माणूस काहीच सांगाय तयार न्हायी. आम्हाला वाटलं चोर, दरवडेखोर हायीत, न्हायतर आमचा माग काडत काडत इथवर आल्यात का काय?"

तो म्हणाला, "म्या, बहिर्जी.. बहिर्जी नाईक. शिवाजी राजांसाठी काम करतु म्या."

हे ऐकून तो म्होरक्या स्तब्ध झाला, काय बोलावे अन काय करावं काहीच सुचेना त्याला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला, डोळ्यांत आसवं दाटली अन गुडघ्यावर बसून हात जोडून म्हणाला,

"कवा पासनं वाट बगत हुतु तुमची, नाईक."

एवढा थोराड माणूस, त्याच्या बापाच्या वयाचा, त्याच्या समोर आता हात जोडून गुडघ्यांवर बसला होता. थोड्याच वेळा पूर्वी त्याच्याशी त्वेषाने लढणारा हाच का तो इसम असा विचार त्याच्या मनात डोकावला.

तोही शांत झाला, अन त्याच्या खांद्याला धरून उठवत म्हणाला , "बाबा, काय झालं? सांगाल काय?"

दोघेही त्या दगडी चबुतऱ्यावर बसून बोलत होते. त्या जंगली माणसांचा म्होरक्या त्याला सांगत होता. याच जंगलात पलीकडे असणाऱ्या डोंगरात एक गुहा आहे, त्यात एक तपस्वी होता. त्या तपस्व्याला एकदा त्याने रानडुकरापासून वाचवलं होत. तेव्हा त्याने हि तलवार त्याला दिली आणि सांगितलं कि, 'या जनतेला परकीय आक्रमणांपासून वाचवण्याचं शिवधनुष्य हाती घेण्यासाठी एका महान मनुष्याचा जन्म होईल तेव्हा तुला हि तलवार त्या सक्षम हातामध्ये सोपवायची आहे. लक्षात ठेव कुणाही गैरकृत्य करणाऱ्या मनुष्याच्या हाती हि तलवार लागता कामा नये. आजपासून तुला मी या तलवारीची जबाबदारी देत आहे.'
तो सांगू लागला.
"शिवाजी राजा बद्दल मी लय आयकून हाय. लय चांगलं काम करत्यात बगा. आम्ही हि अशी रानटी माणसं, जंगलातून भाईर जाणं बी मुश्किल. आन गेलच तर गावात राहणारी माणसं, कुणी शिपाई आम्हास्नी हुसकावून लावत्याती. खान का कोण? त्यो लय मुट्टी फौज घिऊन येतुन म्हणं. आन शिवाजी राजं बी तयारी करत्यात म्हणं. म्हणून म्हणलं आपली काय मदत झालीच तर हि तलवार तेवडी त्यांच्या पातूर नेऊन द्या."
त्याने ती विलक्षण तलवार बहिर्जीच्या हाती दिली. तलवारीचा स्पर्श होताच अंगात वीज सळसळावी अन कसला तरी जबर झटका बसावा असे त्याला झाले. त्याने ती तलवार मस्तकाला लावून वंदन केले.

"जय भवानी "

आपसूकच त्याच्या तोंडून हे शब्द कधी बाहेर आले त्यालाही कळलं नाही. कधी एकदा घोड्याला टाच मारतोय अन प्रतापगड गाठतोय असं झालं होतं त्याला.

।। जय शिवराय ।।

- ईश्वर त्रिम्बक आगम (९७६६९६४३९८)
वडगाव निंबाळकर, बारामती.