Sunday, September 23, 2018

दगा ssss

"इतिहासातील काही सत्य घटनांचा इथे प्रसंगानुरूप उल्लेख केलेला असून या कथेतील बहुतेक प्रसंग काल्पनिक आहेत. काही चुका किंवा काही आक्षेपार्ह आढळल्यास कमेंट मध्ये सांगावे व मोठ्या मनाने माफ करावे हि विनंती."
                                              संध्याकाळची वेळ होती. गर्द वनराईंनी नटलेल्या प्रतापगडावर सूर्याची तांबूस सोनेरी सूर्यकिरणे पडलेली होती. त्यामुळे त्याच्या सौन्दर्यात अजूनच भर पडत होती. गडाची तांबूस काळी अभेद्य तटबंदी अन भरभक्कम बुरुंज खुलून दिसत होते. आकाशामध्ये धनुष्याकृती बगळ्यांची माळ पश्चिमेकडे हळू हळू पुढे सरकत होती. काळ्या पक्षांच्या थवा त्या निरभ्र आकाशामध्ये वेगवेगळ्या दिशेने भिरभिरत होता. सायंकाळचा थंडगार वारा अंगाला झोम्बत होता. दिवसभर काम करून थकून भागून गेलेली शरीरं गार वाऱ्यामुळे थंडावत होती. बहिर्जीही आता गडावर पोहोचलाच होता. घाईनेच त्याने राजांच्या वाड्याकडे धाव घेतली. द्वारपालाशी बोलल्यावर कळलं की राजे आत्ताच काही शिलेदारांसोबत फेरफटका मारायला गेले आहेत. मग तो हि त्याच वाटेने निघाला. राजे त्यांच्या काही साथीदारांसमवेत तटबंदी वरून फेरफटका मारत होते. डोक्यावर भगव्या रंगाचा जिरेटोप अन शेंड्यावर पांढऱ्या सोनेरी रंगाचे मोती डुलत होते. कानातली सोनेरी कुंडलं राजांच्या चालीबरोबर मागेपुढे हेलकावे खात होती. मानेवर रुळणारे तांबूस काळे केस त्या एकूण व्यक्तिमत्वाला साजेसे दिसत होते. अन कपाळावरचे रेखीव शिवगंध, सायंसमयी सूर्यदेवाला अर्घ्यच देत असल्याचा भास होत होता. बुरुजावरून खानाच्या भेटीसाठी तयार असलेला शामियाना न्याहाळतच समोरच्या दगडी चौथऱ्याजवळ राजे काही वेळ विसावले. बाकीचे साथीदारही जागा मिळेल तसे आजुबाजूला राजांपासून पासून काही अंतरावर कोंडाळं करून बसले. थोड्या वेळापूर्वीच ते सगळे खानाच्या भेटीसाठीच्या उभारण्यात आलेला शामियाणा पाहून आले होते. कामगारांनी अन कारागिरांनी दोन दिवस अन दोन रात्र अविश्रांत मेहनत घेऊन सुशोभित, आकर्षक अन डोळ्यांचं पारण फिटेल असा मनमोहक शामियाना उभारलेला होता. शामियान्यातील बारीक सारीक अन लहानातील लहान वस्तू कुठे कशी असावी हे सगळे राजांनी स्वतः बारकाईने तपासले होते अन तशा सूचनाही दिल्या होत्या. प्रवेशद्वार कुठे असेल, मागचे द्वार कुठे असावे, बैठका किती व कशा प्रकारची त्यांची मांडणी असावी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी राजांच्या सल्ल्याने झालेल्या होत्या.
तेवढ्यात बहिर्जीही तेथे पोहोचला. राजे त्याला पाहताच म्हटले,
"या नाईक, काय म्हणतायत खानसाहेब.?"
राजांना मुजरा करतच म्हणाला, "म्हाराज, खान लय उतावळा झालाय तुमास्नी भेटाय."
त्याने सांगायला सुरुवात केली, "म्हाराज, शामियाण्यापासनं दहा बारा कोसाव खानाची छावणी हाय. म्या गीलू व्हतु त्या खानाच्या डेऱ्यात अत्तराच्या निमित्त काडून. लईच संशयी नजरेनं बगत व्हता. कुणाचा बी भरवसा ठेवत न्हाय जी. नोकर चाकराला तर कुत्र्यवानी हाडतुड करतंय. अन महत्त्वाचं म्हंजी, त्यो त्याच्या कपड्यांच्या आत चिलखत कधीच घालत न्हाय जी. पर अंगाव कमीत कमी तीन चार कपडे तरी अस्त्यात. सगळ्यात महत्वाचं म्हाराज, त्याचा येक साथीदार हाय. सय्यद बंडा का बडा सय्यद असं काय म्हणत्यात त्याला. दांडपट्टा चालवण्यात लय हुशार बगा. फक्त त्याच्यावरच त्याचा इस्वास् हाय जी. कुटं बी जावद्या त्यो खानासंग अगदी सावली सारका अस्तुय बगा."
तसं राजे लगेच म्हणाले, "हं, आम्ही खूप ऐकलंय त्याच्याबद्दल."
राजे जिवाजीकडे बोट करून म्हणाले, "तुम्ही त्याच्यावर भेटीच्या वेळी लक्ष ठेवाल. लक्षात ठेवा, फक्त न फक्त त्याच्यावरच लक्ष असुद्या. आम्ही खानाकडे बघू."
जिवाजी त्वेषाने, "जी म्हाराज, काळजीच नगु."
राजे जरा चौथऱ्यावरून उठले अन म्हणाले, "हं, ठीक. पण आपल्याला सावध असायला पाहिजे. न जाणो भेटीच्या वेळी खानाने चिलखत घातले तर आपला डाव फसायचा."
बराच वेळ ते तिथेच मसलत करत बसले होते. खानाच्या भेटीची रणनीती कशी असावी, कोण कोण सोबत असावे, कुणी कुठे थांबावे अशा गोष्टींवर चर्चा झाली. सगळेच खानाची कूटनीती जाणून होते. काय अन कसं होईल म्हणून सगळेच मनानं धास्तावलेले होते. अंधारही दाटून आला होता. राजांनी सगळ्यांना जेवणासाठी आज एकत्रच बसूयात म्हणून सांगितले अन सगळे वाड्याकडे चालू लागले.
                                    रात्रीची जेवणं उरकली. राजे त्यांच्या वाड्यातल्या गच्चीवर सज्जात बसवलेल्या झोपाळ्यावर बसले होते. पायांच्या झोकाबरोबर झोपाळा हलकेच झुलत होता. कड्यांचा हळुवार करकर आवाज होत होता.
दुरूनच बहिर्जी म्हणाला, "महाराज, ईव का?"
विचारांच्या तंद्रीत असल्याने अचानक आलेल्या आवाजाने राजे जरा दचकलेच.
बहिर्जी, "माफ करा महाराज, वर्दी दिऊन न्हाय आलू."
राजे, "नाईक....! या वेळी? एवढी काय तातडी? सकाळी बोललो असतो कि."
"राजं, जरा खाजगीचं व्हतं म्हणून.."
"या, बसा.", राजांनी हाताने खुणावताच बहिर्जी झोपाळ्याशेजारीच असलेल्या दगडी बैठकीवर येऊन बसला. त्याने दोन दिवसांपूर्वी जंगलात झालेल्या जंगली माणसांचा हल्ला अन त्यांच्या म्होरक्याने दिलेल्या विलक्षण तलवारीचा सगळा वृत्तांत राजांना कथन केला. बहिर्जीने ती तलवार राजांसमोर धरली. राजांनाही त्या तलवारीचे आश्चर्य वाटले. सोन्यानं मढवलेली नक्षीदार मूठ, त्यावर दोन्ही बाजूस निळ्या रंगाचा हिरा, हात सव्वा हात लांबीचं तलवारीचं सरळसोट पातं, अन वजनानेही नेहमीच्या तलवारीपेक्षा हलकी अशी ती तलवार राजे पहातच राहिले. त्याच्या सांगण्यानुसार राजांनी त्याच्याशी तलवारीचे दोन हात केले. राजांनी पेललेल्या त्या अद्भुत तलवारीने बहिर्जीने घेतलेल्या दोन्हीही तलवारी मध्यापासून तुटल्या. अन राजे अवाक् झाले. त्यांनाही तसाच अनुभव आला, जो त्याला जंगलामध्ये असताना आला होता. विस्मयकारक नजरेने राजे त्या अद्भुत अन विलक्षण तलवारीकडे पहात होते. वाड्यातल्या भवानी देवीच्या देव्हाऱ्यात राजांनी तलवार ठेवली. भवानी मातेसमोर नतमस्तक होत राजे विचार करत होते, कि या तलवारीच्या रूपाने तर आईने आशिर्वाद दिला नसेल?
****
                  खानाच्या वकिलाकडून खानाला भेटायचा दिवस नक्की करण्यात आला होता. निशस्त्र भेट अन दहा अंगरक्षक सोबत असावेत असे ठरले. भेटीसाठीचा दिवस साधारण नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गुरुवारी भर दुपारी मध्यान्ही ठरवण्यात आला होता. ठरवण्यात आला म्हणजे राजांनीच ती वेळ, तो दिवस ठरवला अन खानाला कबुल करायला भाग पाडले. खान शामियान्यात येऊन काही वेळ होतो न होतो तोच राजे त्याला येउन भेटणार होते. कारण शामियाण्यापर्यंत येण्यासाठी अर्धा कोस अंतर चालून यावं लागायचं. त्या वाटेवरून पालखी व मेणा आणणे खूपच अवघड अन जिकिरीचं होतं. जेमतेम एक माणूस चालत जाईल अशी खाचखळग्यांची, झाडाझुडपांनी वेढलेली अन बाजूलाच खोल दरी अशी ती बिकट वाट होती. या वाटेवरून चालत येताना खान अन त्याचे साथीदार थकून जातील अन त्याच वेळी त्यांना विश्रांतीचाही वेळ न देता आपण भेटायला जायचं अशीच वेळ राजांनी ठरवली होती. गडावरून खानाच्या छावणीपासून ते शामियान्यापर्यंतचा सगळा परिसर नजरेच्या टप्प्यात येत होता. त्यामुळे खानाच्या माणसांची सगळी हालचाल राजांना कळत होती.
****
                    राजांनी शामियान्यात पाय ठेवताच अफजल खान राजांच्या रोखाने बघून हसला. अन म्हणाला, " सिवाजी...! क्या तुम हि हो सिवाजी...?"
राजे ताच्या डोळ्यांना डोळे भिडवून म्हणाले, "काही शंका? अन खान..! खान म्हणतात ते तुम्हीच का?"
खान गडगडाटी हसला, "हाहाहाहाहाहा....!"
अन म्हणाला, "आओ राजे आओ, सब गिले शिकवे भुलकर हमारे गले लग जाओ. आओ...."
राजे सावध पावलं टाकत खानाकडे चालू लागले. खानाने राजांना मिठी मारली. खानाच्या उजव्या बाजूला राजांनी आलिंगन दिले अन डाव्या बाजूला आलिंगन देण्यासाठी ते झुकले. त्याचवेळी खानाने राजांच डोकं डाव्या हाताने काखेत दाबून धरलं. राजे क्षणभरच गोंधळले. तोवर खानाने उजव्या हाताने राजांच्या पाठीवर कट्यारीचा वार केला होता. करकर करत राजांच्या अंगरखा फाटला. खानाच्या लक्षात आले कि राजांनी आतमध्ये चिलखत घातले आहे. खानाचा वार हुका गेला. पण दुसऱ्याच क्षणी राजांनी त्यांच्या उजव्या हातात घातलेली वाघनखं खानाच्या उजव्या कुशीत खुपसली आणि जोर लावून पोटाच्या मध्यापर्यंत ओढली. खानाचा अंगरखा फाटून वाघनखं त्याच्या पोटात घुसली होती.
तशी, "दगा sssssssssssssssss ................", म्हणून खानाच्या शामियान्यात त्याची कानठळ्या बसवणारी जीवघेणी आर्त किंकाळी घुमली. राजांच्या मानेभोवती असलेली खानाच्या डाव्या हाताची पकड ढिली पडली. क्षणाचाही विलंब न करता राजांनी उजव्या हातात लपवलेला बिचवा कचकन खानाच्या उजव्या कुशीत खुपसला अन होत्या नव्हत्या तेवढ्या शक्तीनिशी खानाला मागे रेटले. खान धाडकन मागच्या आसनावर कोसळला. राजांनी मोठ्याने जिवाजीला आवाज दिला , "जिवाsssssssssss, तलवार....".
क्षणार्धात जिवाजीने राजांकडे तलवार फेकली.
"काफर कि औलाद..."
असे म्हणत अन ओरडत खान डाव्या हाताने पोटावर झालेली जखम सावरु लागला. खानाने बैठकीवर असलेल्या रेशमी वस्त्राखाली लपवलेली तलवार क्षणार्धात हाती घेतली. अन दुसऱ्या क्षणी त्याने राजांवर वार केला. राजांनी खानाचा वाराला पलट वार केला.
"खणSSSS....", असा आवज झाला अन खानाची तलवार अर्धी तुटली. एकच क्षण खान गडबडला अन पुन्हा त्याने तुटक्या तलवारीनिशी राजांवर वार केला. पुन्हा तेच घडले पण या वेळी राजांच्या तलवारीचा वार खानाच्या मस्तकावरच झाला अन खान पाठीमागे भेलकांडतच जाऊन पडला. त्याचक्षणी मागच्या द्वाराचा पडदा सारून आत आलेल्या सय्यद बंडाच्या दांडपट्याचा वार राजांच्या मस्तकावर झाला होता. डोक्यावर असलेला शिरपेच दूर जाऊन पडला अन त्याचबरोबर आतमध्ये असलेले शिरस्राणही. सय्यद बंडाचा वार एवढा जबरदस्त होता कि राजांच्या डाव्या भुवयीवर अर्ध्या बोटा एवढी लांब अन गव्हाएवढी खोल जखम झाली अन रक्तही येऊ लागलं. राजांना आता डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली होती. डाव्या हाताने ती जखम दाबून धरली अन कसेबसे धडपडतच सावरण्याचा प्रयत्न करू लागले. तोच एवढा वेळ खानाने त्याच्या डाव्या हाताने दाबून धरलेल्या पोटाच्या जखमेतून आतडीच बाहेर येऊ लागली खान ओरडतच तो ती दोन्ही हातांनी सावरू लागला. आता सय्यद राजावर पुन्हा वार करणार...! त्याने हातातील दांडपट्टा त्वेषाने राजांच्या दिशेने भिरकावला. त्याचा तो आवेश अन उगारलेला दांडपट्टा पाहताच राजांनी आपले डोळे बंद करून घेतले. "सप्प......", असा आवाज झाला अन राजांचा अंगरखा रक्तानं माखला. राजांनी थरथरत हलकेच पापणी वर उचलली तर समोर सय्यद बंडाचा हात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तरीही तो खांद्यापासून तुटलेल्या हातानीशी समोरच उभा होता. त्याने डाव्याहाताने कमरेची कट्यार उपसली अन पुन्हा तो राजांवर वार करणार, या वेळी मात्र त्याच शिरच धडावेगळं झालं अन धाडकन तो राजांच्या समोरच कोसळला. राजांबरोबर आलेल्या जिवाजीने शामियान्याच्या दारातूनच त्याच्या दांडपट्याच्या वाराने सय्यदचा खात्मा केला होता. शामियान्याबाहेर झाडाझुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या राजांच्या शिलेदारांनी पळणाऱ्या खानावर सपासप वार केले. ओरडतच खान खाली पडला तोच एका शिलेदाराने त्याचं मुंडक धडावेगळं केलं. कसलाच वेळ न दवडता राजांनी गड जवळ केला. ताबडतोब गडावरून तोफांना बत्ती देण्यात आली.
"धडाsssssssssssम धूम....धडाssssssssssम धूम"
तोफांवर तोफा गडावरून खानाच्या मुख्य छावणीवर बरसू लागल्या. खानाच्या छावणीतील सैन्याची जशी पांगापांग झाली तशी झाडाझुडपांमध्ये, जंगलांमध्ये दबा धरून बसलेली राजांची सेना खानाच्या गाफील, बेसावध असलेल्या सेनेवर तुटून पडली. अचानक झालेल्या हल्ल्याने, झाडा झुडपांतून येणाऱ्या बाणाने घायळ होऊन वाट फुटेल तिकडे खानाची माणसं सैरावैरा पळू लागली. पण पळून पळून पळणार तरी कुठवर जिकडे जाईल तिकडे घनदाट जंगल अन अचानक होणाऱ्या हल्ल्याने, कापकापीने खानाच्या सैन्याची दाणादाण उडाली होती. चहूबाजूंनी होणारे हल्ले, जाळपोळ, कापाकापी अन लुटालूट यामुळे खानाची थोडीशीच सेना कशीबशी पळून जाण्यात यशस्वी झाली. पण खानाबरोबर आलेली सगळी शस्त्र सामग्री, हत्ती, घोडे, उंट, तोफा, जडजवाहीर अन बरेच मौल्यवान सामान राजांच्या हाती लागले. अन स्वराज्यावर आलेलं खानरूपी महाभयंकर वादळ शांत झालं.
।। जय शिवराय ।।
******
(वाचकांच्या माहितीसाठी - छत्रपती शिवाजी महाराजांसोबत प्रतापगड संग्रामावेळी म्हणजे गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर १६५९, दहा साथीदार होते. नावे अनुक्रमे- संभाजी कावजी कोंढाळकर, जिवाजी महाले/महार, सिद्धी इब्राहिम, काटजी इंगळे, येसाजी कंक, कोंडाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सुरजी काटके, विसाजी मुरंबक, संभाजी करवार.)

- ईश्वर त्रिम्बक आगम (९७६६९६४३९८)
वडगांव निंबाळकर, बारामती.

No comments:

Post a Comment