Wednesday, June 27, 2018

फादर्स डे


फादर्स डे....

                               हडपसर गाडीतळ बस स्टॉप वर बस ची वाट पाहत एक कुटुंब अन ते तीन साडे तीन वर्षांचं निरागस लेकरू उभे होते. वेळ संध्याकाळी सातच्या आसपास. मामा मामीकडे जायचं म्हणून ते पोर खूपच खुश होत. बरोबर आणलेली चकली संपली म्हणून आई पुन्हा स्वीट होम मधून चकली अन मिंट चे पॅकेट घेऊन आली. पोर एकदम खुश झालं होतं. बस आली तसं बापाने पोराला उचलून पटकन आतमध्ये जाऊन जागा पकडली अन पोराला सीटावर बसवलं अन सासूला बसायला सांगितलं. 

तसं ते पोर रडवेल्या चेहऱ्याने म्हणाल, "पप्पा तू बस ना इथं"

ते शब्द ऐकून त्या बापाचे डोळे पाण्याने डबडबले अन आलेला हुंदका कसाबसा आवरत तो म्हणाला, "हो बाळा मी मागून येतो तुला भेटायला." 

अन पटकन त्या माणसांच्या गर्दीतून खाली उतरला. 

खिडकीपाशी येऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला, "मी येतो गाडीवर पाठीमागून तुला भेटायला बाळा." 

पोराच्या विरहाने त्या बापाचं काळीज तीळ तीळ तुटत होतं. डोळे पाण्यानं भरलेले, थरथरत्या हाताने तो बाप त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होता. त्या पोराला पण समजलं की आपले आई बाप आपल्याला आजीकडे सोडून चाललेत. डोळे पाण्याने भरलेले, थोड्या वेळापूर्वी हसणारा चेहरा आता एकदम केविलवाणा झालेला. एक शब्द पण बोलू शकत नव्हता तो अशी केविलवाणी अवस्था झाली होती त्याची. अन त्या पोराकडे बघून त्या बापाच्या जीवाला काय वेदना होत होत्या, त्याच तोच जाणे. बस निघाली अन त्या बापाच्या डोळ्यांतून टपटप अश्रू जमिनीवर पडले. त्या अश्रुंनाही धरणीला भेटायची ओढच लागली होती जणू. कसाबसा हुंदका दाबून तो घरी जाण्यासाठी माघारी वळला.
**********

                        रविवार असल्याने आज जरा तो निवांतच उठला, अन नेहमीप्रमाणे व्यायामाला सुरुवात केली. थोड्याचं वेळात त्याचा मुलगा पण उठला अन उठता उठताच म्हणाला, "पप्पा, भीम लाव ना."
त्याला पोगोवर भीम लावुन दिले व तो व्यायाम करण्यात मग्न झाला. त्याच्या मुलाचं मधूनच त्याच्या अंगावर उड्या मारणं चालू असायचं. दोन तीन दिवसां पासून तो न त्याची बायको त्या मुलाच्या मनाची तयारी करत होते की, 'मम्मा तुला खेळणी आणायला जाणार आहे, तेव्हा तू आज्जी कडे राहशील अन स्कूलला पण जाशील, मग चौकात फिरायला जाशील, निशी न स्नेहल बरोबर पण खेळशील.', अन बरंच काय काय. त्याला हे सर्व सांगायचं कारण असं कि, त्याची बायको परराज्यात वीस दिवसांच्या एका कला प्रशिक्षणाला जाणार होती. मुलाची शाळा सुरु होऊन नुकतेच दोन तीन दिवस झाले होते. रोज सकाळी नऊ ते अकरा पर्यंत शाळा, नर्सरी स्कूल. सगळ्या मुलांना त्यांचे पालक सोडायला यायचे, पोरं जशी त्या शाळेत एन्ट्री करायची तशी त्यांची रडायची सुरुवात. शिक्षक लोक दरवाजा लावून घ्यायचे कारण पालक दिसले की मुलं खूपच आकांडतांडव करायची, मुलांना असं वाटायचं कि आतमध्ये नेमकं असं काय चाललंय कि सगळेच रडतायत. त्याचा मुलगा तर रडत रडत, "माझ्या मम्मा ला घ्या ना आतमध्ये." असं सारखं त्या मॅडम ला म्हणत होता. असं एकंदरीत वातावरण चालू होत. त्याच्या बायकोच अन त्याच्या आईच काही जमत नसायचं म्हणून त्या आपल्या गावीच असायच्या. त्याच्या मुलाला जवळ जवळ सात आठ महिने तिच्या माहेरीच ठेवावं लागलं. गावी महिन्या दोन महिन्यातून एखाद दुसऱया वेळी जाणं येणं व्हायचं तेवढंच. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने आणि आता शाळेत टाकायचं असल्याने त्याला इकडे आणले होते. शाळा कुठे सुरु होते न होते तोच याच्या बायकोचा परराज्यात ट्रेनिंग ला जायचा प्लॅन. आता त्याच्या मुलाची ठेवायची पंचाईत. वीस पंचवीस दिवस त्याच्या सासुरवाडीला ठेवावे लागणार. त्याला त्याच्या आईला विचारून बघावं असं वाटतं होत तेवढंच पोर बापा जवळ तरी राहील. पण तिचा त्याला ठाम नकार. 
     चहा अंघोळ वगैरे उरकून मुलाला फिरायला येतोस का म्हणून त्याने पेपर, अन बिस्किट्स आणले तोवरच त्याचा मेहुणा अन त्याची बायको दारात हजर. आज त्याच्या सासूबाई अन सासरे पण येणार होते. दळण थोडंच शिल्लक असल्याने तो पुन्हा ते दळून आणायला, अन थोडी भाजी आणायला गेला. माघारी येईपर्यंत सासुसासरे आलेच होते. जेवणं वगैरे आटोपली अन सासरे निघाले गावी. ते पुन्हा दोन दिवसांनी येणार होते. सासूबाई दोन दिवस पिंपळे निलखला जाणार होत्या. मग मुलाला पण त्यांच्या बरोबरच पाठवावे लागणार होते. दुपारी सगळे थोडा वेळ झोपले, पण मग त्याचा मुलगा हि झोपला निवांत. सात ची बस हि डायरेक्ट गावाला जायची, म्हणून त्या अगोदर उठून आवराव लागणार होत. त्याची बॅग भरता भरता त्याला त्याच्या मुलासबोतची जेवणा नंतरची दंगल, सकाळच चहा बिस्कीट अन छोटा भीम, संध्याकाळी ग्राउंड वरचा बॅटबॉल, असे एक ना अनेक प्रसंग त्याचा डोळ्यासमोरून जाऊ लागले. त्याला उठवताना तर त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं. एवढासा पोर, एवढे दिवस आई बापाबरोबर राहतोय आणि आज अचानक त्याला आज्जी बरोबर पाठवताना त्यालाच रडू यायला लागलं होतं. मग त्या मुलाला कसं वाटत असेल? 

तो, "बाळा चल, मामा कडे जायचं ना?"

रडवेल्या चेहऱ्याने ते मुल म्हणालं, "मला नाय जायचं, मला इथंच राहायचंय"

"अरे चल बाळा, आपली बस जाईन मग. तुला मी भिंगरी घेऊन देतो, मामीला नाय द्यायची बरं का, फक्त मामालाच द्यायची."

तो खूपच रडवेला झाला होता, अन मला नाय जायच असे सारखं म्हणत होता. त्याला पण त्याच्या मुलाला उठवताना कसेतरीच वाटत होत. पण इलाज नव्हता. त्याला कसंबसं तयार केलं. जाताना एक भिंगरी घेतली, ज्यातून साबण्याच्या पाण्याचे फुगे निघतात. ते पोर एकदम खुश झालं. 

जाताना त्याचे चालूच होते, "मम्मा तुला खूप खेळणी आणणार आहे, आणि खूप खाऊ आणणार आहे. तू राहशील ना आज्जीकडे, अन निशी न वैनी बर खेळायचं बर का, अन स्कूल ला पण जायचं" 

ते निरागस पोर त्या भिंगरीमुळे एवढं खुश झालं होतं की, सगळ्याला हो हो म्हणत होत. काय योगायोग म्हणावं याला, आज फादर्स डे आणि एक बाप त्याच्या पोराला त्याच्यापासून दूर राहण्यासाठी समजावत होता. हे असलं फादर्स डे च गिफ्ट, त्या तीन साडे तीन वर्षांच्या पोराला देताना त्या बापाच्या जीव तीळ तीळ तुटत होता.

ईश्वर त्रिंबक आगम
वडगांव निंबाळकर, बारामती.


दुसरीतलं लव्ह लेटर


दुसरीतलं लव्ह लेटर....

                           प्राथमिक मुलांची शाळा नंबर एक नीरा बारामती रोड शेजारी समोरून दोन नंबर ची इमारत, जवळजवळ १५० वर्षे जुनी, कौलारू छप्पर, सागवानी लाकूड अन मजबूत दगडी बांधकाम असणारी. अजूनही दिमाखात उभी आहे. मधला वर्ग अ तुकडीचा, शिरगावे बाई त्या वर्गाला शिकवत असत, तर ब तुकडीला शिलवंत बाई. हेड मास्तर पण शिरगावे गुरुजी. धिप्पाड देह, गौरवर्ण, अंगात पांढरा सदरा अन पांढरा पायजमा हा त्यांचा नेहमीचा पोशाख. आवाज तर असा भारदस्त आणि दमदार, कि रागावले तर पोर चड्डीतच मुतायची. मी पण त्यांचा एकदा शिकार झालो होतो. परीक्षेच्या वेळी तर हातात भाला मोठा दगड घेऊन फिरायचे.
म्हणायचे, "कुणी कॉपी केली आणि पेपर कुणाचा बघून लिहिला तर दगडूनच घालील टाळक्यात."
सगळी पोर त्यांना घाबरून असायचे, त्यांना समोरून येताना जरी पाहिलं तरी लांब पळून जायचे. वर्गाच्या बाहेर कौलांवर पारव्यांची घरटी, अन क्वचितच वटवाघूळ लटकलेली असायची. शाळेला जुन्या झालेल्या फाटकाचं कुंपण, कुठे कुठे तुटलेली, तर कुठे कुठे गायब झालेली, गंज लागलेल्या तांबूस रंगाची असायची.
                 दुसरीच्या वर्गात शिलवंत बाई मुलांना शिकवत होत्या. थोड्याच वेळात शाळा सुटणार होती. सात आठ वर्षे वयाचं एक पोर फळ्याजवळच्या टेबलाला टेकून एका पाय दुमडून मुसुमुसु रडत उभा होतं. बाईंनी त्याला शाळा सुटेपर्यंत तिथं उभं राहायची शिक्षा दिली होती. डोळे पाण्याने भरलेले, गंगा यमुना गालावरून वाहत होत्या, नाकाला आलेलं पाणी पुसून पुसून हातही ओले झालेले. शिवाय, गालावरच पाणी खाली पायांवर पडून त्यांना पण अभिषेक चालू होता. रुमाल वापरायची पद्धतच नव्हती हो त्यावेळी. सगळी पोर त्याच्याकडं बघून खि-खि हसत होती. ते आपलं बिचारं खाली मान घालून मुसमुसत होतं.

**********

                मी नुकतंच दुसरीच्या वर्गात गेलो होतो. बाभमाळ्याचा पिंट्या दुसऱ्यांदा दुसरीत नापास झाला होता. तर लाल्या पण नापास होऊन माझ्या वर्गात आला होता. पिंट्या एकदम काळा कुळकुळीत जसं काय आयबापानी डांबराच्या बॅरल मधून बुडवून काढलाय कि काय. लाल्या आपला जिगरी दोस्त. कांत्या माझ्याच वर्षाला पण अ तुकडीत होता. हि आमच्या माळेवस्तीतली पोर. बाकी मग चेतन, रोहन, विकास वगैरे जरा हुशार मंडळी पण आपले दोस्त होते.
               दोन तीन महिने जेमतेम झाले असतील. रोज शाळेत जाताना येताना आमची गॅंग एकत्रच असायची. पिंट्या खूप घाण घाण शिव्या द्यायचा आणि तब्येतीने पण जरा आडदांड असल्यामुळे लय दादागिरी करायचा. त्यामुळे सगळी पोरं जरा त्याला बिचकूनच असायची. शिलवंत बाई आमच्या वर्ग शिक्षिका. मी त्यांच्या खुर्ची समोरच बसायचो, पण पिंट्याने दम देऊन आणि त्याच्या माराच्या भीतीने मला ती जागा सोडावी लागली. कारण त्याला बाईंचं त्याच्यावर जास्त लक्ष असावं आणि बाईंची काम करायला मिळावी म्हणून. पण लाल्या आपला जिगरी, त्याने मला त्याच्या जागेवर जागा दिली अन तो मागे बसू लागला. आता मी एकदम फळ्याच्या समोरच बसायला लागलो होतो. त्यामुळे बाई शिकवताना मी एकदम फळ्यासमोरच असायचो. याच्यावरून पिंट्याचं आणि लाल्याच भांडण झालं. लाल्याने त्याच्या बाप्पुन्ना सांगितल्यामुळे पिंट्या पुन्हा काही बोलला नाही. तांबटाचा नित्या, दत्त्या आणि किसऱ्या आमच्या पुढे एक वर्षे होते. शाळा सकाळी ७ ला भरायची आणि १२.२० च्या आसपास सुटायची. शाळा सुटली कि आम्ही सगळे खटकाच्या थिएटरवर पिक्चर बघायला जायचो. नित्याची आणि किसऱ्याची ओळख असल्यामुळे आम्हाला राहिलेला पिक्चर फुकटात बघायला मिळायचा. पण सगळ्यात मागे बसायचं. त्यातले लव्ह सिन बघून बघून आम्ही पण तसेच करायला शिकलो होतो. घरून जेवण करून टरमाळी घेऊन आम्ही पांदीतल्या चारीत सगळे ओळीवार बसायचो. ते काम झालं कि आम्ही गुजराच्या कवटीच्या झाडाखाली गप्पा मारत बसत असू. दुपारशिपची हायस्कुलची शाळा आणि कॉलेज भरायची वेळ तीच असायची. रस्त्यावरून जाताना पोरी दिसल्या कि आम्ही पिक्चर मध्ये बघितलेले फ्लयिंग किस्सेस ची ट्रायल करून बघायचो.

काही पोरी हसायच्या तर काही , "ये बावळत, मूर्ख, नालायक." असल्या शिव्या द्यायच्या.

कोण म्हणायचं, "नाव काय रे तुझं? आईबापाला माहितय का, असले धंदे करतोय ते?"

आम्हाला खूप हसू यायचं आणि गम्मत पण वाटायची. याचा परिणाम बाभमाळ्याच्या पिंट्यावर जास्तच दिसून आला.

कधी कधी तर तो पिक्चर मधले डायलॉग मारायचा, "ये जानेमन.. आयलबीव...चलती है क्या..."

काही पोरी त्याला शिव्या द्यायच्या तर काही त्याच्या घाण घाण शिव्यांना घाबरून गप्प निघून जायच्या. त्यामुळे झालं असं कि त्याला मुलींच्या शाळेतली एक मुलगी खूप आवडायला लागली. कधी तिला एखाद लव्ह लेटर देतोय असं झालं होत त्याला. आम्ही जेमतेम दुसरीतली पोर, सात आठ वर्षांच्या आसपास आमची वयं. हे असलं म्हणजे कळसच होता. ती मुलगी गोळे गुरुजींच्या क्लास ला जायची त्या क्लास ला विकास, रोहन आणि चेतन पण असायचा. प्रणाली तीच नाव, चेतन च्या घराजवळच राहायची त्यामुळे त्याची ती लहानपणापासूनची दोस्त. त्यांचे गांगल स्टोअरच दुकान होत, तसेच टेलरिंग चे सामान पण विकायला असायचे. माझ्या वडिलांचा म्हणजे नानांचा टेलरिंग चा व्यवसाय असल्याने मी खूपदा त्यांच्या दुकानातून सामान आणायचो. पण मला ती कोण आहे आणि कोणत्या वर्गात आहे काही माहिती नव्हती. शाळेत येताना जाताना चेतन, रोहन, विकास अन हि पण एकत्रच यायचे. आता हे पिंट्याच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. चेतन माझा दोस्त असल्यामुळे पिंट्याने मला दमदाटी करून त्याच्याशी ओळख वाढवली.

आणि एके दिवशी म्हणाला, 'संदिप्या एक लव्ह लेटर लिवून पायजे"

मी, "मी का दीव, तुझं तू ली की."

"देणार का नाय ****, नाय तर रोज मारिन कुत्रीच्या आयगत."

"मी नाय देणार."

त्या दिवसापासून त्याने मला त्रास द्यायला सुरुवात केली, नाय व्हय करता करता मी लाल्याच्या सांगण्यावरून घाबरून लिहायला तयार झालो. मधली सुट्टी झाल्यावर आम्ही शाळेच्या डाव्याबाजूला रुपेश काकांच्या घरामागे जमलो. पिंट्याने एक वहीच्या कागद फाडून आणला होता.

"संदिप्या, एक मोठ्ठा लव्ह काड, मधून येक बाण दाव आणि आयलबिव असं लिव"

मी,"हूं"

त्याने सांगितल्या प्रमाणे मी त्याला करून दिलं आणि वर्गात माझ्या जागेवर जाऊन बसलो. तोवर पिंट्याने त्या कागदाची मस्त घडी घालून चेतनला गाठलं आणि त्याला ती चिट्ठी प्रणालीला द्यायला सांगितलं. मधल्या सुट्टीत काही मुली ग्रामपंचायत पाशी खेळायला यायच्या तिथे चेतन ने तिला ती चिट्ठी दिली. तिने ती चिट्टी बघून सरळ तिच्या वर्गशिक्षिका बाईंना नेऊन दाखवली. पिंट्याने दुपारच्या सुट्टीतच दांडी मारली होती. आमच्या बाईंना मुलींच्या शाळेत बोलावून घेतलं आणि सगळा प्रकार त्यांना समजला. तोवर प्रणाली तिच्या आईला घेऊन आमच्या हेड मास्तरांच्या ऑफिस मध्ये हजर. तिने सांगितल्यावर चेतनला बोलावून घेतले.

शिरगावे गुरुजी, "का रे? चिट्टी तू दिलीस का?"

चेतनची तर पार घाबरगुंडी उडाली होती आणि रडकुंडीला पण आला होता.

त्याने सांगितले कि, "मी दिली होती पण ईश्वर ने लिहिली होती."

आमच्या बाई तिथेच होत्या त्यांनी सांगितले कि, "मी आत्ताच त्याला मार दिला आहे आणि वर्गात अंगठे पकडून उभे राहायची शिक्षा दिली आहे."

शिरगावे गुरुजी, "हुं",

"अजून कुना कुणाला ओळखतेस?", गुरुजी प्रणालीला.

तिने रोहन आणि विकास ची नावे सांगितल्यावर, त्यांना पण बोलावून घेतले. ते दोघे तर जाम टरकले होते.

"का रे भडव्यांनो. असले धंदे करायला येता का शाळेत. अभ्यास कमी पडला काय तुम्हाला."

आता तिघे पण रडायला लागले होते, चड्डीच तेवढी ओली व्हायची राहिली होती.

"पुन्हा जर असलं काही केलं तर टाळक्यात दगुडच घालीन."

त्यांना छड्यांचा मार किंवा सणदिशी कानाखाली पडली असेल कदाचित. वर्गाच्या बाहेर त्यांना अंगठे धरून अभे राहिला सांगितलं होत. बाई वर्गावर येऊन मला खूप रागवल्या. विशेष म्हणजे बाईंनी मला मारलं नाही कारण मी अभ्यासात हुशार होतो आणि त्यांच्या आवडत्या विद्यार्थ्यांमधील एक होतो, आणि मी असं करणार नाही हे त्यांना चांगलंच ठाऊक होत. त्यांनी विचारल्यावर मी सांगितलं की मला पिंट्याने दमदाटी करून चिठ्ठी लिहायला सांगितली. पण मला शिक्षा म्हणून शाळा सुटेपर्यंत फळ्याशेजारच्या टेबलाजवळ उभं राहायला सांगितलं होतं. दुपारी घरी घेल्यावर मी बाहेर फिरायलाच गेलो नाही. संध्याकाळ होई पर्यंत आमच्या माळेवस्तीत हि खबर पसरली होती.

मधू नाना तर म्हणत होते,"तिरमकच प्वार आत्ताच असं कराय लागलंय, मोठं झाल्याव काय काय करल काय माहित."

मी नानांना सांगितलं की मला पिंट्याने दम देऊन लिहायला सांगितलं होतं. त्या नंतर पिंट्याशी बोलणंच बंद केलं. आणि त्याने पण मला कधी दमदाटी केली नाही. कधी कधी शिव्या द्यायचा, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचो. कारण नानांनी त्याच्या घरी जाऊन पण सांगितलं होतं. त्या दिवसापासून दोन तीन दिवस पिंट्याने दांडी मारली होती. पण, जेव्हा तो शाळेत आला तेव्हा मात्र बाईंनी त्याला छडीचे फटके पण दिले होते. त्या दिवसापासून आम्ही जानी दुश्मन झालो होतो. पण माझं नाव साऱ्या माळेवस्तीत झालं होतं की तिरमक च्या पोरानी पोरीला लव्ह लेटर दिल म्हणून..

ईश्वर त्रिंबक आगम
वडगांव निंबाळकर, बारामती.


बंगल्यावरची जांभळं


*बंगल्यावरची जांभळं*

                       झेड पी मुलांची सकाळची शाळा सुटून एक दोन तास झाले होते. पांदीतल्या बाभळीच्या झाडीत बॉस च्या अड्ड्यावर सात आठ पोरं जमली होती. आठ दहा वर्षांच्या आस पास वय असणारी, अंगात जुने हाफ शर्ट आणि खाली हाफ चड्डी घातलेली, कुणाकडे इनरवियर नसायची पण, तशीच हाफ चड्डीत, क्वचित पायात लखानी किंवा प्यारागॉन ची निळा बंध असलेली चप्पल. असं एकंदरीत पोरांचा पेहराव. बॉस एका मोठ्या दगडावर बसला होता.

बॉस त्यांच्यातल्या एका लहान पोराकडे बघत, "अय चला जायचा का इरिगेशन बंगल्याव लींडी जांभळं काडाय."

सगळी पोरं खी खी करून त्या पोराकडे बघत हसत होती. अन ते बिच्चारं नाराज होऊन निघून जायला लागलं होतं.

बॉस,"ये संदिप्या आरं लका कुठं लगीच घरी चाल्ला."

त्या पोरांच्यातला एक काळा कुळकुळीत आडदांड पोऱ्या, "जाऊदी कि **** ला घरी, आपल्या टोळीत असली मेंगी नसल्यालीच बरी. तुझ्या आईची **** , **** , चल पळ."

संदिप्या,"ये तुझ्या आयला, शिव्या द्यायच्या नाय आं."

त्यो काळ्या पोऱ्या, "देणार ****, काय करणार. **** "

बॉस, "ये गप्पय पिंट्या. असू दी. य हिकडं संदिप्या."

तरी पण संदिप्या निघून गेला तो गेलाच, त्या दिवशी काय अड्ड्यावर आलाच नाय.

********

                 मी दुसरी तिसरीत असेन त्या वेळची गोष्ट. पांदीतल्या बाभळीच्या झाडीत आमची सात आठ जणांची टोळी आमच्या नेहमीच्या अड्ड्यावर जमा व्हायची. हो त्या वेळी असलं आताच्या ग्रुप सारख काही नव्हतं, टोळीच म्हणायचे. आणि अड्डा म्हणजे काय हिंदी चित्रपटात गुंड लोकांचा असतो तसं काही नव्हे बरं का. एक साफसुफ केलेली जागा आणि आजूबाजूला बसायला ठेवलेली दगडी असं काहीस चित्र. मागच्या बाजूला गुजराचं दहा बारा एकरांचा रान.सकाळी सकाळी गावातली बायका-माणसं तिकडंच टरमाळी घेऊन पळायची. या आमच्या अड्ड्यावर गव्हाच्या भरडून ठेवलेल्या पेंढ्या एकमेकांवर रचून ठेवलेल्या.आणि त्यामध्ये आमच्या टोळीचा माल लपवून ठेवलेला. यात असायचं काय तर आंब्याच्या कोय, चिंचोक्यांनी गोट्यांनी भरलेली गाडगी, बिपीन गायछाप तंबाखूच्या पुड्या,संभाजी बिडीची फुकून पडलेली थोटकं अन एखाद दुसरी काडेपेटी. आमचा बॉस तांबटाचा नित्या आणि भाबमाळ्याचा पिंट्या नेहमी यातली तंबाखू खायचे आणि बिड्या ओढायचे. नित्या तर अशा स्टाईल मध्ये बिड्या ओढायचा जस काय स्वतःला अजय देवगण चा बापच समजायचा. सगळी पोरं त्याला बॉस म्हणायची, कारण काहीही करायचं असेल अन कोणतीही गोष्ट असेल तर हे बेणं नेहमी पुढे. थापा मारायला तर एक नंबरच बिलंदर.

आम्हाला नेहमी सांगायचं, "आमचा आज्जा लय डेंजर व्हता. एकदा फारीस्टात लाकडं आणायला गेला व्हता. तर त्याला तिथं खविस भेटलं. ते माझ्या आज्याला म्हणलं, तुला जर हातून लाकडं घिऊन जायचं असलं तर माझ्या संग कुस्ती करायला लागलं. मंग काय आज्याची आणि त्याची लय मुठी कुस्ती झाली आणि आमचा आज्यानी हरवलं त्याला. तवपासन जवा जवा आमचा आजा फारीस्टात जायचा तवा तवा ते खविस त्याला कायम मदत करायचं."

अन त्याच्या बापाचा किस्सा पण लय रंगवून सांगायचं, "आमचं तात्या एकदा चौपणावरून घरी येत व्हतं.आणि त्याच एका उदाबरं भांडण झालं. आमच्या तात्यांनी त्याला गुप्तीनी मारलं."

च्यायला ह्याचा छपराच्या घरात कधी आम्हाला यानं गुप्ती दाखवली पण नाही आणि कधी दिसली पण नाही. अशा एक से बढकर एक धापा टाकायचा.अन आम्हालाही ते खरं वाटायचं. तर असा हा आमच्या टोळीचा बॉस. नित्याची जात तांबट असल्याने त्याला आमच्या आळीतली मोठी माणसं तांबटाचा नित्या असच म्हणायचे. आणि पोरं पण सगळी त्याच्या गैरहजेरीत असच म्हणायचे. उंचीला सगळ्यात बुटका म्हणून कधी कधी त्याला बुटका नित्या असं पण म्हणायचे.

                       बाभमाळ्याचा पिंट्या तर लय डेंजर. काळा कुळकुळीत जस काय डांबराच्या बॅरल मधून आयबापानी बुडवून काढलाय का काय असं वाटायचं. घरी चार पाच म्हशी त्यामुळे सकाळ संध्याकाळ दुधाचा रतीब. म्हणून चांगलाच आडदांड आणि रगील. त्याच्या शिव्या असल्या खत्रूड आणि घाण-घाण आयमाय वरून असायच्या कि जर एखाद्या सुशिक्षिताने ऐकल्या तर हार्ट अटॅक येऊन तिथंच मरायचं. कोणतीही शिवी द्यायच्या आधी त्याच एक फेव्हरेट वाक्य असायचं.

"आच्ची कुच्ची गवं, पोळ्या केल्या नवं." अन त्याच्या नंतर ह्याच्या ठेवणीतल्या सणसणीत शिव्यांचा पाऊस. याच्या घरी बोंबील आणि सुकट विकायचा धंदा असल्याने त्याचा अंगाला नेहमी बोंबलाचा घमघमाट सुटलेला असायचा. कधी कधी तर चड्डीतल्या खिशात सुकट भरून खात यायचा. पिंट्या आणि त्याचा लहान भाऊ दाद्या रोज शाळा सुटली कि ओढ्यावर घरच्या म्हशी चरायला घेऊन जायचे. म्हशी तिकडंच गवताच्या हिरवळीवर बांधून यायचा अन नेहमीच्या अड्ड्यावर सामील व्हायचा. दिवसभर आमच्या बरोबर हुंदडायचा आणि संध्याकाळी ओढ्यावरून म्हशी आणताना त्यातल्याच एका म्हशीवरून बसून यायचा. हातात एक फोक असायचा अन तोंडात,

" हल्या हो...हाईक..ब्रूआ..."

असा वाटायचं रेड्यावर बसून यमराज थाटमाटातं चाललाय. त्यामुळे त्याच्या नादी आमच्या टोळीतलं कोण लागत नसे. अन तसं कधी झालंच तर त्याला पाच दहा आयमाय वरून शिव्या अन खाली जमिनीवर पाडून, त्याच्या उरावर बसून त्याला बुकलून काढल्याशिवाय याला कधी बरं वाटायचंच नाही.

                                                यादवाचा किसऱ्या आम्हा सगळ्यात लय उपद्व्यापी. गणपतीतल्या लाईटच्या माळा बनाव, छोट्या बॅटरी वर चालणारी मोटार वापरून गाडी बनव, सूर्यफुलाच्या वाळलेल्या काट्यांपासून बैलगाडी बनव, जुन्या रेडिओच्या खराब झालेल्या सेलपासून खेळणी बनव. असले एक ना अनेक त्याचे सायंटिस्ट लेव्हल चे शोध चालू असायचे. म्हणून आमच्या टोळीत त्याला एक वेगळ्याच प्रकारचा मान होता. या सगळ्यांत मी थोडा शाळेत हुशार असल्याने मला पण थोडा मान असायचा.लाल्या माझ्याच वर्गात असल्याने आणि परीक्षेच्या वेळी माझी मदत त्याला व्हायची म्हणून तो मला जरा जास्त जवळचा दोस्त मानायचा. तर असे हे आमच्या टोळीतले नमुने. बाकी लाल्या, दट्ट्या, आणि कांत्या पण टोळीत असायचे. कधी गुऱ्हाळावर चोयट्या गोळा करणे, गुळाच्या ढेपा पाडणे, कधी काकवी उसाचा रस प्यायला जाणे, गावातल्या उकिरड्यांवर पुट्ठे गोळा करून रद्दी विकणे, ओढ्याने कधी मासे तर कधी खेकडे पकडणे.सरकारी विहिरीपाशी असलेल्या हिरव्या वेलींच्या पांढऱ्या चिकापासून बॉल बनवणे. असले कायच्या काय आमचे उद्योग चालू असायचे.
*************

                        दहा पंधरा दिवसांपूर्वीची गोष्ट, त्यादिवशी नेहमीप्रमाणे शाळा साडेसातला भरून साडेबाराला सुटली. आम्ही सगळे आपापल्या घरी जेवण करून आमच्या अड्ड्यावर जमलो होतो.

नित्या,"चला आज जांभळं काढाय जायचं का रं?"

किसऱ्या,"कुठं रं?"

नित्या,"इरिगेशन बंगल्यावच्या जांभळीला लय जांभळं आल्यात तिकडच जाऊ."

पिंट्या,"नकु लका,  तिथंल इंग्लिश कुत्रं लय खतृडय."

नित्या,"आरं नाय काय व्हत, बांधल्याल असतंय ते."

नाय होय म्हणता म्हणता सगळे तयार झाले. निघालो आम्ही मग गुजराच्या कवटी खालून, गुजराच्या रानातून बांदा बांदाने चिलाईच्या देवळा शेजारून आम्ही इरिगेशन बंगल्याच्या मागच्या बाजूला जिथे जांभळीच झाड होत तिथे जाऊन पोहोचलो. इरिगेशन बंगल्याचा परिसर वीस पंचवीस एकराचा. त्यात पाट बंधारे खात्याचे कार्यालय, पोलीस स्टेशन आणि तिथे काम करणाऱ्या लोकांची घरे होती. सगळा परिसर तारेच्या कम्पाऊंडने बंदिस्त केलेला. आणि त्याच परिसरात एक मोठं जांभळाचं झालं होतं. त्याला लेंडी जांभळं अशा करता म्हणत कि ती जांभळं शेळीच्या लेंड्यांसारखी पण खूप गोड अन चवदार असायची. झाड खूपच उंच आणि मोठं होतं. काळीभोर जांभळं झाडाला लगडलेली होती. खाली गर्द सावली पडली होती. रविवारचा दिवस असेल कदाचित म्हणून आजूबाजूच्या शेतात शेतकरी नव्हते. कंपाउंड च्या अलिकडचे शेत नुकतेच नांगरून घेतले होते म्हणून मोठं मोठाली ढेकळं तुडवतच आम्हाला तिथं पोहोचाव लागलं.

नित्या,"वर कोण चडतंय?"

दत्त्या आणि किसऱ्या मोठे असल्याने तयार झाले आणि त्यांनी वर चढायला सुरुवात केली. बघता बघता किसऱ्या खूप उंचावर चढला. काही जांभळं चाखून बघितली आणि म्हणाला,

"आयला लय भारी जांभळं हायीत लका."

पटा पटा त्याने अगोदर स्वतःच्या चड्डीत जांभळं कोंबायला सुरुवात केली.

मी, "एक टाक कि लका, बगू कसं लागतंय?"

त्याने वरून चार पाच जांभळं खाली टाकली.

लगेच नित्या म्हणाला, "हंजाप"

आणि सगळी जांभळं त्याने त्याच्या खिशात कोंबली आणि एक दोन खाल्ली पण. आमच्या टोळीत 'हंजाप' कुणी म्हटलं की ज्या गोष्टीसाठी तो म्हनलाय त्यानेच ती गोष्ट घ्यायची बाकी कुणी तिला हात पण लावायचा नाही. आमचा हंजाप शब्द हा हिंदी चित्रपटाला 'हैण्ड्स अप' या पोलिसांच्या डायलॉग वरून आलेला. मला तर खूप राग आलेला, च्यायला कशाला हा शब्द आमच्या टोळीत आला कोण जाणे. दर वेळी हा नित्या म्हणणार आणि जी कोणती गोष्ट पहिल्यांदा आपल्याला दिसली असली तरी तो हंजाप म्हणाला की त्याचीच झाली. जेव्हा दत्त्या आणि किसऱ्याच्या चड्डीचे खिसे टम्म फुगले, तेव्हा मग त्यांनी खाली जांभळं टाकायला सुरुवात केली. आम्ही पटापटा आमच्या खिशात आणि आणलेल्या प्लास्टिक च्या पिशवीत भरू लागलो. किसऱ्याने टाकलेली जांभळं मी आणि नित्या गोळा करत होतो तर दत्याने टाकलेली लाल्या, पिंट्या आणि दाद्या गोळा करत होते. जांभळं खूपच गोड, थोडी आंबट, थोडी तुरट होती पण एकदम मस्त होती. खाऊन खाऊन आमच्या जिभा गुलाबी जांभळ्या रंगाच्या झाल्या होत्या.

नित्या,"ये संदिप्या, आरं बास कर कि लका चड्डी फाटन आता वज्यानी"

मी,"थांब कि लका आजून थोडी भरू दि."

मी तारेच्या कंपाउंड च्या आतमध्ये जांभळं गोळा करत होतो. या सगळ्यांपेक्षा लहान असल्याने मी सहज दोन तारांच्या मधून गेलो. फक्त दाद्या माझ्या बरोबर होता, बाकीचे बाहेरच होते. मी आणलेल्या प्लास्टिक च्या पिशवीत पटापट जांभळं भरत होतो. आता दत्त्या आणि किसऱ्या पण खाली उतरत होते. अन अचानक पिंट्याने ते इंग्लिश कुत्रं सुटल्याची बोंब ठोकली.

"अय पळा आयघाल्याहो...ते कुत्रं सुटलंय..पळा.."

दत्त्या अन कीसऱ्याने पण पटदिशी उड्या मारल्या अन धूम पळत सुटले. त्यांच्या पाठीमागे लाल्या, नित्या,कांत्या पण पळू लागले. मी मागे वळून बघितले तर ते कुत्रं जोरजोरात भुंकत माझ्याकडेच धावत येत होत. दाद्या पण कम्पाऊंडच्या जवळ असल्याने पटकन दोन तारांमधून बाहेर निघून पळत सुटला. मी पण घाई घाईत कम्पाऊंडकडे पळत जाऊन पटकन तारांमधून बाहेर आलो. बाहेर येत असताना शर्टला तार लागून थोडा शर्ट टरकला अन हाताला पण थोडं ओरखडलं.

मी,"काय लका, थांबा कि"

माझ्या बोलण्याकडे कोण लक्ष देतो, जो तो आपला जीव मुठीत घेऊन पळत होता. मोठं मोठाली ढेकळं तुडवत जाताना खूपच त्रास होत होता. पायांना पण खर्चटत होत. ते कुत्रं अगदी खूप जवळ आलं होत.नेमकं मी मागे बघायला अन पुढच्या एका मोठया ढेकळiवरून पाय घसरून पडायला एकच वेळ झाली. जसं मी खाली पडलो त्या कुत्र्याने मला गाठलं होत अन जोर जोरात माझ्या जवळ येऊन भुंकायला लागलं. मी माझ्या हाताला जे सापडेल ते धरून त्याला मारायचा प्रयत्न करत होतो.

मी,"हाड हाड" म्हणत होतो.

तर ते कसलं जातंय. मग तर जरा त्याला जास्तच चेव आला आणि त्याने माझी चड्डीच धरली त्याच्या दातात. आगगग मी तर ठो ठो बॉम्बलायला लागलो होतो. मला खाली पडलेलं बघून अन कुत्रं मला माझी चड्डी धरून ओढताना बघून आमची टोळी मग हातात ढेकळं घेऊन माझ्याकडे पळत यायला लागली. आणि ढेकळं माझ्या दिशेने भिरकवायला लागली. तरी ते कुत्र काय माझी चड्डी सोडायचं नाव घेईना. मी तर पार रडायला लागतो होतो, हाड हाड म्हणून पार घसा बसायची वेळ आली होती. ते माझी चड्डी पण सोडेना अन मला ओढायला पण लागलेला. अचानक एक दोन ढेकळं त्याच्या पेकटात बसली तशी त्याने माझी चड्डी सोडली. अन जे कुई कुई करत दोन्ही पायात शेपूट घालून पळत सुटलं ते मालकाच्या घराबाहेर जाऊन भुंकत बसलं. माझ्या तर रडून रडून नाकातून डोळ्यातून पाणी असलं होत. आणि सगळ्यांना शिव्या घालत होतो.

"आयघाल्याहो, थांबायचं कि थोडं."

सगळी घी घी करून हसत होती, अन मी आपलं हाताने शर्ट धरून डोळे अन तोंड पुसत होतो.

पिंट्या,"कशाला **** घालाय एवढ्या आत गेलता मंग.आपली **** बाहेरच निजवायची ना?" झाली ह्याच्या ठेवणीतल्या शिव्यांना सुरुवात.

नित्या,"आयो संदिप्या आता चवदा इंजिशन घ्यायला लागत्यान तुला"

मी त्या कुत्र्याने जिथं चड्डी धरून ओढत होता तिथं बघत होतो. पण कुठं त्याचा दात लागला नव्हता कि रक्तही येत नव्हतं. बरं झालं चावल नाय, नाय तर आधी बापानी धरून धुतला असता.

"नाय लका,नाय चावल कुठं."

कांत्या,"बगू चड्डी काडून दाव बरं"

"नकु मी बगतु घरी जाऊन."

सगळे हसायला लागले. माझी जवळ जवळ सगळीच जांभळं त्या झटापटीत खाली पडून खराब झाली होती. सगळे मग घरी जायला निघाले. चिलाईच्या देवळा जवळच्या मोटरंवर हातपाय धुवून आम्ही घराकडे निघालो. लाल्यानं मला त्याच्या जवळची अर्धी जांभळं दिली आणि गुजराच्या कवटी खालून घराकडं निघालो.

लाल्या माझ्या खांद्यावर हसत टाकून, "आरं नाय काय व्हत, दात नाय ना लागला मंग नगु टेन्शन घिव."

"हुं"

त्या दिवसापासून कुणी बंगल्या वरल्या जांभळाचं नाव जरी काढलं तरी भीती वाटायची कारण ते इंग्लिश कुत्रंच दिसायचं समोर माझी चड्डी धरून ओढताना. परत कधी तिकडं चकून पण फिरकलो नाही.

ईश्वर त्रिंबक आगम
वडगांव निंबाळकर, बारामती.


शाळेतली बोरं….


शाळेतली बोरं….

उन्हाळ्याचे दिवस. वेळ सकाळी ११ ची. सगळीकडे कशी सामसूम झालेली. क्वचितच लिंबाच्या झाडीतून पक्षांचा किलबिलाट. चार पाच हाफ चड्डीतली पोरं. अंदाजे दहा बारा वर्षे वयाची. शाळेतल्या गणपती बसवायच्या खोलीवर खिडकीतून हळू हळू वर सरकत होती. खोलीमध्ये काही खराब झालेली बाकं, मोडलेल्या खुर्च्या अन टेबलं अस उपयोगात नसणार सामान असायचं. खिडकीच्या खाली जुन्या बांधकामातल्या उरलेल्या दगडांचा ढिगारा रचलेला होता. म्हणून खिडकी सहज हाताला यायची. पोरं हळू हळू एक एक करून वर चढत होती. धोंड्या सगळ्यात पुढं, त्यालाच माहित होतं कि रांगोळे मास्तर च्या बोरीच्या झाडाला किती अन कुठं कुठं बोर लागली होती. रांगोळे मास्तरचा म्हातारा बाप कायम बोरीच्या झाडाखाली काथ्याने बांधून केलेल्या लाकडाच्या बाजेवर पडलेला असायचा. अंगात बंडी घातलेली आणि नाना टेलर म्हणजे माझ्या वडिलांकडून शिवून घेतलेला पायजमा हा त्याचा अवतार असायचा. पोरं आता नववी क च्या वर्गावर चढून कुठं कुठं बोर लागली आहेत त्याचा अंदाज घेत होती. शाळेच्या नवीन बांधलेल्या वर्गांचे पत्रे सिमेंटचे होते. बोरीच्या फांद्या बहुतेक करून सगळ्या पत्र्यावर पसरलेल्या होत्या. त्यामुळे बोरं एकदम् अशी वरच्या वर दिसायची. पिवळी, तांबडी, नारंगी, लालेलाल टप्पोरी बोरं लगडलेली होती झाडाला. पोरांच्या तोंडाला तर पाणीच सुटलं होतं, दोघा तिघांनी तर खाऊन पण बघितली. कधी एकदा आपल्या अर्ध्या चड्डीचे खिसे भरून घेतोय अस झालं होतं. सगळेजण पटापट मिळतील तेवढी मोठं मोठाली बोरं आपापल्या खिशात कोंबत होते. न जाणे ते म्हातारं यायचं आणि सगळं बोंबलायचं, म्हणून सगळे घाई करत होते. नाम्या जरा पुढे पुढे जाऊन मोठं मोठाली लालेलाल बोरं काढत होता. पुढच्या फांद्यांना पण जरा लालेलाल बोरं होती. अन त्यात नाम्याने नवीनच लखानी चप्पल घेतली होती, म्हणून काटे काय पायाला लागत नव्हते.

हश्या म्हणाला, "भाडखाऊ, लय फुडं जाऊ नकु."

नाम्या, "थांब जरा, लय मोठी बोरं हायीत राव."

हश्या जरा बाहेर बाहेरूनच बोरं काढत होता. अन धोंड्या पण जरा पलीकडच्या बाजूने बोरं खिशात कोंबत होता. सगळं कस एकदम व्यवस्थित चाललं होतं. पण न जाणे कुठं माशी शिंकली. अचानक त्या म्हाताऱ्याला आम्ही कुठून दिसलो काय माहित. घाण घाण शिव्या हासडायला केली ना सुरुवात. अन त्यात दगडी पण मारायला लागलं.

म्हातारं, "आईघाल्याहो काय बापाची पेंड हाय काय हिथं. काय गटुड पुरलंय व्हय भाडखावांनो."

धोंड्या, "पळा लवकर.. च्यायला आलं ते म्हातारं….."

हश्या मला म्हणाला, "संदीप चल लवकर."

आईच्या गावात आता झाली का बोम्ब. आता आपण नाही सुटत ह्याच्या हातून. हश्या पहिला पळाला, त्याच्या मागे नाम्या. माझी तर टरकलीच होती, खालून त्या म्हाताऱ्याची दगडं, त्यात बोरीचे काटे. ते कसे बसे चुकवत चुकवत मी मागेच राहिलो. धोंड्याने पलीकडच्या बाजूने उडी मारून कधी पोबारा केला कळलं पण नाही. जशी हश्याने खालच्या सामानाच्या खोलीवर उडी मारली नाम्याने पण लगेच उडी मारली. नववी क चा वर्ग थोडा उंच होता म्हणून खाली उडीच मारावी लागली. दोघांनी एकाच वेळी उडी मारल्याने आणि सिमेंट चा पत्रा जुना असल्याने दोघे पत्रा फोडून आत मध्ये पडले. धाडकन् मोठा आवाज झाला, पुढे होऊन बघतो तर काय, खाली पत्र्याला भले मोठे भगदाड पडलेलं. नाम्या खाली रडत होता आणि हश्याला पण हात पायाला खरचटलं होतं. माझी तर बोबडीच वळली होती. नानांना जर कळलं कि आपण इथे होतो, तर पट्ट्यानेच मार होता. हळूच खाली उतरून जिथे कुठे पत्रा शिल्लक होता तिथे हळू हळू पाय ठेऊन कसबस मी खिडकीपाशी आलो. घाबरलो तर एवढा होतो कि वाटत होतं आता वरूनच खाली उडी मारावी. दहा बारा फूट उंच खोली होती ती. कसतरी खिडकीला धरून घसरतच खाली आलो. हाता - पायाला खरचटलं, पण तिकडे कोण लक्ष देतो. आणि जी धूम ठोकली ते शाळेचं तारेचं कंपाउंड पार करून, नीरा-बारामती रस्ता ओलांडून, आमच्या दुकानातून डायरेक्ट घरात जाऊन बसलो. जीव नुसता घाबरा घुबरा झाला होता. नानांना जर कळलं तर आपलं काही खरं नाही.

===========

                   दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये, शाळेतील विज्ञान प्रयोग शाळेच्या पाठीमागच्या लिंबाच्या झाडीमध्ये बॅटबॉलचा खेळ आमचा ठरलेला असायचा. हश्या, निल्या, दिन्या, मिल्या, लाल्या, दत्त्या, भावड्या, नाम्या, पेट्या अशी आमची टीम असायची. मधल्या लिंबाच्या झाडाला स्टम्प म्हणून तिथे बॅटिंग. तिथून पुढे दहा बारा ढेंगा पुढे एक मोठा दगड ठेवलेला तिथून बॉलिंग.अन त्याच्या पाठीमागे दोन ढेंगा पाचवी अन सहावी च्या वर्गांची भिंत आमची बाऊंड्री. डायरेक्ट वर कौलाला बॉल लागला किंवा शाळेच्या पलीकडे बॉल गेला कि आऊट. डाव्या बाजूला पिवळ्या फुलांचं एक मोठं झाड होतं आणि उजव्या बाजूला एक लहान पण थोडं उंच असं एक लिंबाचं झाड होतं. त्या दोन्ही झाडांच्या आतमध्ये जर रन्स काढल्या तरच त्या धरायच्या. असे आमचे नियम. स्टंप म्हणून ठरवलेल्या लिंबाच्या झाडाला कुऱ्हाडीने खाचा दत्त्यानेच पडल्या होत्या. ते झाड पाहून आजही तो लक्षात राहतो. त्या दिवशी आम्ही नेहमी प्रमाणे बॅटबॉल खेळत होतो. रविवार असेल बहुतेक. द्वितीय सत्र परीक्षा सुरु व्हायला एक दोन महिने बाकी होते. साधारण फेब्रुवारी - मार्च चा महिना असेल. कधी नव्हे तो तात्याच्या वर्गातला त्याचा मित्र धोंड्या पण आला होता. खेळून झाल्यावर दिन्या, निल्या, मिल्या आणि तात्या पुढे निघून गेले होते.

तेवढ्यात धोंड्या म्हणाला, " ये चला. त्या रांगोळे मास्तर च्या झाडाला लय भारी बोरं आल्यात. येणार का?"

हश्या म्हणाला, " चला."

मी तर एका पायावर तयार. हश्या जे म्हणेल किंवा ज्या बाजूला असेल त्याला माझा नेहमी हो असायचा. कारण एक तर त्याचे बाप्पू आमच्याच शाळेत लेखनिक पदावर कामाला. त्यांचं घर आमच्या माळेवस्तीत सूशीक्षित. त्यात तो हुशार पण. आमच्या पुढे दोन वर्षे असल्यामुळे साहजिकच मला तो माझा आदर्श वाटायचं. त्यामुळे मी नेहमी त्याच्या बरोबर असायचो. अभ्यासाला, फिरायला, खेळायला, देवाला नेवैद्य दाखवायला मी नेहमी त्याच्या बरोबर. त्याच अक्षर पण छान, त्यामुळे मी पण त्याचीच री ओढायचो अन त्याच्या सारखेच करायचो.

पण नाम्या म्हणाला, " नाय बाबा, मला गुरांना पाणी दावायचंय. मी नाय येत."

हश्या, " चलय भाडखाऊ, संद्या हाय न घरी."

नाम्या, "नकु राव. मी जातु घरी."

नको नको म्हणत असताना, हश्याने नाम्याला यायला तयार केलं. आणि अश्या प्रकारे आम्ही रांगोळे मास्तरांच्या झाडाची बोरं काढायला गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थना आणि जण गण मन झालं. नाम्या आणि हश्याला हेड मास्तरांच्या खोलीत बोलावून घेतलं होतं. त्या वेळी तांबे सर म्हणून हेड मास्तर होते. लय डेंजर होतं म्हातारं. आम्हाला लय वेळा झाडीतून बॅटबॉल खेळताना पळवून लावल होतं. आणि त्याला सामील तो शाळेतला लंगडा माने शिपाई.

आम्ही तर त्याला, "ये लंगड्या.", असच म्हणत असू.

नाम्याच्या घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे त्याचे वडील तर फुटलेल्या पत्र्याची नुकसान भरपाई देण्यास असमर्थ होते. शेवटी हश्याच्या बाप्पुन्नाच जवळ जवळ पाचशे रुपये द्यावे लागले. त्या वेळी पाचशे रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती.
          काल मी पळून गेल्यावर नेमकं काय झालं ते मला दुसऱ्या दिवशी कळलं. त्याच झालं असं कि, नाम्या आणि हश्या पत्रा फुटून आतमध्ये पडले. नाम्या तर रडायलाच लागला होता. हश्याच्या पण हाताला अन पायाला खरचटलं होतं.

हश्या, " गपय आयघाल्या, लय घाई झालती न तुला पळायची भाडखाऊ."

नाम्या, " मंग मी काय करू, पळायच्या नादात नाय कळलं."

हश्या, " हुं, म्ह्स शानायस."

हश्याने एक टेबल लावून त्यावर चढून वरच्या अँगल ला धरलं. लोम्बकळताच हळू हळू कसंतरी तो वर चढला आणि बाहेर आला. नाम्या आता खाली रडायला लागला.

" ये, मला घी कि राव वर."

"बस आता आत मधेच भाडखाऊ."

नाम्या, "ये नाय राव, आमचं दाजी लय मारत्याल राव मला."

हश्याने मग नाम्याला वरून हात दिला. नाम्या टेबल वर चढल्यावर त्याला हळू हळू वर ओढून घेतलं. आता गपचूप इथून कुणाला कळायच्या आत सटकायचं असच हश्याने ठरवलं होतं. पण न जाणे गोतारणे आणि कदम सर दोघेही खाली नेमके टपकले होते. नाम्या अन हश्याचा चेहरा तर बघण्यासारखाच झाला होता.

जसे दोघे खाली उतरले, गोतारने सर, "काय करत होता वर?"

कदम सर हश्याकडे बघून , "तु आगम सरांचा ना?"

हश्या, "हा."

"वर काय करत होता?"

हश्याला लक्षात आलं कि यांना काही कळलं नाहीये. नाम्या तर त्या दोघांना बघून लटपट कापायला लागला होता. हश्या त्यांना दुसरं काहीतरी कारण सांगणार तेव्हड्यात नाम्या पचकला,

"सर आम्ही बोरं काढाय गेलतु, आणि पत्रा फुटला."

झालं, सनदिशी नाम्याच्या कानाखाली आवाज. नाम्याच्या डोळ्यासमोर दिवसा काजव दिसलं. हश्याचे वडील शाळेत असल्याने तो वाचला. पण यांनी हि खबर तांबे सरांना पोहोचती केली. जशी हि खबर हश्याच्या बाप्पुन्ना कळली, आम्हाला कळलं कि हश्याला बाप्पुनी त्यांची खोली बंद करून लाथा बुक्क्यांनी झोडपलं. हाणायच्या बाबतीत त्यांचे बाप्पू लय डेंजर. तात्याला तर लय वेळा फोकललं होतं. आम्ही तर त्यांना लय टरकून असायचो. ते रस्त्याने येताना दिसले तरी आम्ही दुसऱ्या रस्त्याने. च्यायला त्यावेळचा धाक दरारा वेगळाच होता. त्या दिवसापासून पुढचे पाच सात दिवस हश्या काय घराच्या बाहेर पडतोय. अन तेव्हा पासून शाळेतल्या बोरांचा नाव कधी आमच्या तोंडात आलं नाही. बरं झालं माझ्या घरी काही कळलं नाही. आमाला पट्ट्यानीच आरती ओवाळली असती आमच्या बापानी.

ईश्वर त्रिंबक आगम
वडगांव निंबाळकर, बारामती.