शाळेतली बोरं….
उन्हाळ्याचे दिवस. वेळ सकाळी ११ ची. सगळीकडे कशी सामसूम झालेली. क्वचितच
लिंबाच्या झाडीतून पक्षांचा किलबिलाट. चार पाच हाफ चड्डीतली पोरं. अंदाजे दहा बारा
वर्षे वयाची. शाळेतल्या गणपती बसवायच्या खोलीवर खिडकीतून हळू हळू वर सरकत होती. खोलीमध्ये
काही खराब झालेली बाकं, मोडलेल्या खुर्च्या अन टेबलं अस उपयोगात नसणार सामान असायचं.
खिडकीच्या खाली जुन्या बांधकामातल्या उरलेल्या दगडांचा ढिगारा रचलेला होता. म्हणून
खिडकी सहज हाताला यायची. पोरं हळू हळू एक एक करून वर चढत होती. धोंड्या सगळ्यात पुढं,
त्यालाच माहित होतं कि रांगोळे मास्तर च्या बोरीच्या झाडाला किती अन कुठं कुठं बोर
लागली होती. रांगोळे मास्तरचा म्हातारा बाप कायम बोरीच्या झाडाखाली काथ्याने बांधून
केलेल्या लाकडाच्या बाजेवर पडलेला असायचा. अंगात बंडी घातलेली आणि नाना टेलर म्हणजे
माझ्या वडिलांकडून शिवून घेतलेला पायजमा हा त्याचा अवतार असायचा. पोरं आता नववी क च्या
वर्गावर चढून कुठं कुठं बोर लागली आहेत त्याचा अंदाज घेत होती. शाळेच्या नवीन बांधलेल्या
वर्गांचे पत्रे सिमेंटचे होते. बोरीच्या फांद्या बहुतेक करून सगळ्या पत्र्यावर पसरलेल्या
होत्या. त्यामुळे बोरं एकदम् अशी वरच्या वर दिसायची. पिवळी, तांबडी, नारंगी, लालेलाल
टप्पोरी बोरं लगडलेली होती झाडाला. पोरांच्या तोंडाला तर पाणीच सुटलं होतं, दोघा तिघांनी
तर खाऊन पण बघितली. कधी एकदा आपल्या अर्ध्या चड्डीचे खिसे भरून घेतोय अस झालं होतं.
सगळेजण पटापट मिळतील तेवढी मोठं मोठाली बोरं आपापल्या खिशात कोंबत होते. न जाणे ते
म्हातारं यायचं आणि सगळं बोंबलायचं, म्हणून सगळे घाई करत होते. नाम्या जरा पुढे पुढे
जाऊन मोठं मोठाली लालेलाल बोरं काढत होता. पुढच्या फांद्यांना पण जरा लालेलाल बोरं
होती. अन त्यात नाम्याने नवीनच लखानी चप्पल घेतली होती, म्हणून काटे काय पायाला लागत
नव्हते.
हश्या म्हणाला, "भाडखाऊ, लय फुडं जाऊ नकु."
नाम्या, "थांब जरा, लय मोठी बोरं हायीत राव."
हश्या जरा बाहेर बाहेरूनच बोरं काढत होता. अन धोंड्या पण जरा पलीकडच्या
बाजूने बोरं खिशात कोंबत होता. सगळं कस एकदम व्यवस्थित चाललं होतं. पण न जाणे कुठं
माशी शिंकली. अचानक त्या म्हाताऱ्याला आम्ही कुठून दिसलो काय माहित. घाण घाण शिव्या
हासडायला केली ना सुरुवात. अन त्यात दगडी पण मारायला लागलं.
म्हातारं, "आईघाल्याहो काय बापाची पेंड हाय काय हिथं. काय गटुड पुरलंय
व्हय भाडखावांनो."
धोंड्या, "पळा लवकर.. च्यायला आलं ते म्हातारं….."
हश्या मला म्हणाला, "संदीप चल लवकर."
आईच्या गावात आता झाली का बोम्ब. आता आपण नाही सुटत ह्याच्या हातून. हश्या
पहिला पळाला, त्याच्या मागे नाम्या. माझी तर टरकलीच होती, खालून त्या म्हाताऱ्याची
दगडं, त्यात बोरीचे काटे. ते कसे बसे चुकवत चुकवत मी मागेच राहिलो. धोंड्याने पलीकडच्या
बाजूने उडी मारून कधी पोबारा केला कळलं पण नाही. जशी हश्याने खालच्या सामानाच्या खोलीवर
उडी मारली नाम्याने पण लगेच उडी मारली. नववी क चा वर्ग थोडा उंच होता म्हणून खाली उडीच
मारावी लागली. दोघांनी एकाच वेळी उडी मारल्याने आणि सिमेंट चा पत्रा जुना असल्याने
दोघे पत्रा फोडून आत मध्ये पडले. धाडकन् मोठा आवाज झाला, पुढे होऊन बघतो तर काय, खाली
पत्र्याला भले मोठे भगदाड पडलेलं. नाम्या खाली रडत होता आणि हश्याला पण हात पायाला
खरचटलं होतं. माझी तर बोबडीच वळली होती. नानांना जर कळलं कि आपण इथे होतो, तर पट्ट्यानेच
मार होता. हळूच खाली उतरून जिथे कुठे पत्रा शिल्लक होता तिथे हळू हळू पाय ठेऊन कसबस
मी खिडकीपाशी आलो. घाबरलो तर एवढा होतो कि वाटत होतं आता वरूनच खाली उडी मारावी. दहा
बारा फूट उंच खोली होती ती. कसतरी खिडकीला धरून घसरतच खाली आलो. हाता - पायाला खरचटलं,
पण तिकडे कोण लक्ष देतो. आणि जी धूम ठोकली ते शाळेचं तारेचं कंपाउंड पार करून, नीरा-बारामती
रस्ता ओलांडून, आमच्या दुकानातून डायरेक्ट घरात जाऊन बसलो. जीव नुसता घाबरा घुबरा झाला
होता. नानांना जर कळलं तर आपलं काही खरं नाही.
===========
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये, शाळेतील विज्ञान प्रयोग शाळेच्या पाठीमागच्या
लिंबाच्या झाडीमध्ये बॅटबॉलचा खेळ आमचा ठरलेला असायचा. हश्या, निल्या, दिन्या, मिल्या,
लाल्या, दत्त्या, भावड्या, नाम्या, पेट्या अशी आमची टीम असायची. मधल्या लिंबाच्या झाडाला
स्टम्प म्हणून तिथे बॅटिंग. तिथून पुढे दहा बारा ढेंगा पुढे एक मोठा दगड ठेवलेला तिथून
बॉलिंग.अन त्याच्या पाठीमागे दोन ढेंगा पाचवी अन सहावी च्या वर्गांची भिंत आमची बाऊंड्री.
डायरेक्ट वर कौलाला बॉल लागला किंवा शाळेच्या पलीकडे बॉल गेला कि आऊट. डाव्या बाजूला
पिवळ्या फुलांचं एक मोठं झाड होतं आणि उजव्या बाजूला एक लहान पण थोडं उंच असं एक लिंबाचं
झाड होतं. त्या दोन्ही झाडांच्या आतमध्ये जर रन्स काढल्या तरच त्या धरायच्या. असे आमचे
नियम. स्टंप म्हणून ठरवलेल्या लिंबाच्या झाडाला कुऱ्हाडीने खाचा दत्त्यानेच पडल्या
होत्या. ते झाड पाहून आजही तो लक्षात राहतो. त्या दिवशी आम्ही नेहमी प्रमाणे बॅटबॉल
खेळत होतो. रविवार असेल बहुतेक. द्वितीय सत्र परीक्षा सुरु व्हायला एक दोन महिने बाकी
होते. साधारण फेब्रुवारी - मार्च चा महिना असेल. कधी नव्हे तो तात्याच्या वर्गातला
त्याचा मित्र धोंड्या पण आला होता. खेळून झाल्यावर दिन्या, निल्या, मिल्या आणि तात्या
पुढे निघून गेले होते.
तेवढ्यात धोंड्या म्हणाला, " ये चला. त्या रांगोळे मास्तर च्या झाडाला
लय भारी बोरं आल्यात. येणार का?"
हश्या म्हणाला, " चला."
मी तर एका पायावर तयार. हश्या जे म्हणेल किंवा ज्या बाजूला असेल त्याला
माझा नेहमी हो असायचा. कारण एक तर त्याचे बाप्पू आमच्याच शाळेत लेखनिक पदावर कामाला.
त्यांचं घर आमच्या माळेवस्तीत सूशीक्षित. त्यात तो हुशार पण. आमच्या पुढे दोन वर्षे
असल्यामुळे साहजिकच मला तो माझा आदर्श वाटायचं. त्यामुळे मी नेहमी त्याच्या बरोबर असायचो.
अभ्यासाला, फिरायला, खेळायला, देवाला नेवैद्य दाखवायला मी नेहमी त्याच्या बरोबर. त्याच
अक्षर पण छान, त्यामुळे मी पण त्याचीच री ओढायचो अन त्याच्या सारखेच करायचो.
पण नाम्या म्हणाला, " नाय बाबा, मला गुरांना पाणी दावायचंय. मी नाय
येत."
हश्या, " चलय भाडखाऊ, संद्या हाय न घरी."
नाम्या, "नकु राव. मी जातु घरी."
नको नको म्हणत असताना, हश्याने नाम्याला यायला तयार केलं. आणि अश्या प्रकारे
आम्ही रांगोळे मास्तरांच्या झाडाची बोरं काढायला गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थना आणि जण गण मन झालं. नाम्या आणि हश्याला
हेड मास्तरांच्या खोलीत बोलावून घेतलं होतं. त्या वेळी तांबे सर म्हणून हेड मास्तर
होते. लय डेंजर होतं म्हातारं. आम्हाला लय वेळा झाडीतून बॅटबॉल खेळताना पळवून लावल
होतं. आणि त्याला सामील तो शाळेतला लंगडा माने शिपाई.
आम्ही तर त्याला, "ये लंगड्या.", असच म्हणत असू.
नाम्याच्या घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे त्याचे वडील तर फुटलेल्या
पत्र्याची नुकसान भरपाई देण्यास असमर्थ होते. शेवटी हश्याच्या बाप्पुन्नाच जवळ जवळ
पाचशे रुपये द्यावे लागले. त्या वेळी पाचशे रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती.
काल मी पळून गेल्यावर नेमकं काय झालं
ते मला दुसऱ्या दिवशी कळलं. त्याच झालं असं कि, नाम्या आणि हश्या पत्रा फुटून आतमध्ये
पडले. नाम्या तर रडायलाच लागला होता. हश्याच्या पण हाताला अन पायाला खरचटलं होतं.
हश्या, " गपय आयघाल्या, लय घाई झालती न तुला पळायची भाडखाऊ."
नाम्या, " मंग मी काय करू, पळायच्या नादात नाय कळलं."
हश्या, " हुं, म्ह्स शानायस."
हश्याने एक टेबल लावून त्यावर चढून वरच्या अँगल ला धरलं. लोम्बकळताच हळू
हळू कसंतरी तो वर चढला आणि बाहेर आला. नाम्या आता खाली रडायला लागला.
" ये, मला घी कि राव वर."
"बस आता आत मधेच भाडखाऊ."
नाम्या, "ये नाय राव, आमचं दाजी लय मारत्याल राव मला."
हश्याने मग नाम्याला वरून हात दिला. नाम्या टेबल वर चढल्यावर त्याला हळू
हळू वर ओढून घेतलं. आता गपचूप इथून कुणाला कळायच्या आत सटकायचं असच हश्याने ठरवलं होतं.
पण न जाणे गोतारणे आणि कदम सर दोघेही खाली नेमके टपकले होते. नाम्या अन हश्याचा चेहरा
तर बघण्यासारखाच झाला होता.
जसे दोघे खाली उतरले, गोतारने सर, "काय करत होता वर?"
कदम सर हश्याकडे बघून , "तु आगम सरांचा ना?"
हश्या, "हा."
"वर काय करत होता?"
हश्याला लक्षात आलं कि यांना काही कळलं नाहीये. नाम्या तर त्या दोघांना
बघून लटपट कापायला लागला होता. हश्या त्यांना दुसरं काहीतरी कारण सांगणार तेव्हड्यात
नाम्या पचकला,
"सर आम्ही बोरं काढाय गेलतु, आणि पत्रा फुटला."
झालं, सनदिशी नाम्याच्या कानाखाली आवाज. नाम्याच्या डोळ्यासमोर दिवसा
काजव दिसलं. हश्याचे वडील शाळेत असल्याने तो वाचला. पण यांनी हि खबर तांबे सरांना पोहोचती
केली. जशी हि खबर हश्याच्या बाप्पुन्ना कळली, आम्हाला कळलं कि हश्याला बाप्पुनी त्यांची
खोली बंद करून लाथा बुक्क्यांनी झोडपलं. हाणायच्या बाबतीत त्यांचे बाप्पू लय डेंजर.
तात्याला तर लय वेळा फोकललं होतं. आम्ही तर त्यांना लय टरकून असायचो. ते रस्त्याने
येताना दिसले तरी आम्ही दुसऱ्या रस्त्याने. च्यायला त्यावेळचा धाक दरारा वेगळाच होता.
त्या दिवसापासून पुढचे पाच सात दिवस हश्या काय घराच्या बाहेर पडतोय. अन तेव्हा पासून
शाळेतल्या बोरांचा नाव कधी आमच्या तोंडात आलं नाही. बरं झालं माझ्या घरी काही कळलं
नाही. आमाला पट्ट्यानीच आरती ओवाळली असती आमच्या बापानी.
ईश्वर
त्रिंबक आगम
वडगांव
निंबाळकर, बारामती.
No comments:
Post a Comment